Chief Justice Chandrachud’s relationship with Sawantwadi
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून बुधवारी धनंजय चंद्रचूड यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शपथ दिली. धनंजय चंद्रचूड यांचे वडील यशवंत चंद्रचूड हेही सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते. आता त्यांच्या सुपुत्राने सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे चंद्रचूड हे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील करसेनर गावचे रहिवासी आहेत. मात्र चंद्रचूड घराण्याची नाळ सावंतवाडीशी जोडली गेलेली आहे. धनंजय चंद्रचूड यांचे आजोबा विष्णू चंद्रचूड हे सावंतवाडी संस्थांनात दिवाण होते. त्यानंतर हे घराणे मुंबईत गेले. पुढे विष्णू चंद्रचूड यांचे पुत्र यशवंत चंद्रचूड सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश झाले. सर्वाधिक काळ सरन्यायाधीश म्हणून ते कार्यरत राहिले. 1978 ते 1985 या काळात ते सरन्यायाधीश होते त्यांच्या काळात अनेक महत्त्वपूर्ण खटल्यावर निकाल लागले. सावंतवाडी संस्थानचे राजे शिवरामराजे भोसले यांनी यशवंत चंद्रचूड यांचा सत्कारही केला होता. त्यानंतर राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाला धनंजय चंद्रचूड यांनी हजेरी लावली होती. सावंतवाडी संस्थानाशी चंद्रचूड घराण्याने कायम नाळ ठेवली होती. तीन पिढ्या ते सावंतवाडी संस्थानशी नाळ ठेवून होते. पूर्वी संस्थानात राजांच्या अनुपस्थितीत दिवाण हे न्याय निवाड्याचे करीत असत. धनंजय चंद्रचूड यांचे आजोबा सावंतवाडी संस्थानात दिवाण होते. पुढे भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यांचे सुपुत्र यशवंत चंद्रचूड न्यायाधीश बनले. तीच परंपरा धनंजय चंद्रचूड यांनी पुढे चालू ठेवली. आता ते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश झाले आहेत. सावंतवाडीच्या दृष्टीने ही अभिमानाची बाब आहे असे सावंतवाडी संस्थांनच्या इतिसाहाचे अभ्यासक प्रा. जी. ए. बुवा यांनी स्पष्ट केले.
सावंतवाडी /प्रतिनिधी-









