राजीव कुमारांचे उत्तराखंडमध्ये 18 किमी ट्रेकिंग ः पोलिंग टीमच्या अडचणी जाणून घेतल्या
वृत्तसंस्था/ देहरादून
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पर्वतीय भागांमध्ये निवडणूक कर्मचाऱयांसमोर उद्भवणाऱया आव्हानांना जाणून घेण्यासाठी 18 किलोमीटरची पायपीट केली आहे. राजीव कुमार प्रथम हेलिकॉप्टरद्वारे पीपलकोटीमध्ये दाखल झाले आणि त्यानंतर उत्तराखंडच्या दुर्गम क्षेत्रातील दुमक आणि कलगोथ गावात पोहोचले. तेथे निवडणुकीदरम्यान पोहोचण्यासाठी निवडणूक कर्मचाऱयांना 3 दिवसांचा कालावधी लागतो.
निवडणुकीदरम्यान कर्मचाऱयांसमोर येणाऱया आव्हानांना जाणून घेण्यासाठी हा दौरा करू इच्छित होतो. कर्मचाऱयांच्या गरजा समजून घेण्यासाठी अशाप्रकारच्या आणखीन मतदान केंद्रांचा दौरा करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राजीव कुमार यांनी 15 मे रोजी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कार्यभार सांभाळला आहे. 14 मे रोजी सुशील चंद्रा यांचा मुख्य निवडणूक आयुक्तपदाचा कार्यकाळ समाप्त झाला होता. दुर्गम भाग, पाकिस्तान सीमेला लागून असलेली गावे, उग्रवाद-दहशतवाद प्रभावित भागांमध्ये तैनात निवडणूक पथकाला हार्डशिप अलाउन्स आणि विमा संरक्षण देण्याचा विचार आयोग करत असताना मुख्य निवडणूक आयुक्तांनी ही पदयात्रा केली आहे.
दुमक आणि कलगोथ ही मतदान केंद्रे बद्रीनाथ विधानसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतात. गोपेश्वरपासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावरील दुमक गावात एकूण 290 मतदार आहेत. अलिकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तेथे 80 टक्के मतदान झाले होते. मुख्य निवडणूक आयुक्त कुमार हे एक प्रशिक्षित ट्रेकर असून त्यांनी यापूर्वी हिमालयातील लडाख, हिमाचल, उत्तराखंड, सिक्कीममध्ये पायी प्रवास केला आहे. सह्याद्रीतही ट्रेकिंगचा त्यांना अनुभव आहे.