सांगली / शिवराज काटकर :
सांगली महापालिकेचे तत्कालिन आयुक्त आयएएस अधिकारी शुभम गुप्ता यांची 170 कोटींच्या ठेवींच्या घोटाळ्याप्रकरणी चौकशी शासनाने सुरू केली असून त्यापाठोपाठ या प्रकरणासह विविध घोटाळ्यांचा आरोप झाल्याने राज्याच्या वित्त विभागाने महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी अभिजित मेंगडे यांचीही चौकशी लावली आहे. याबाबतचा आदेश नुकताच महापालिकेस प्राप्त झाला असून अतिरिक्त आयुक्त अडसूळ यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
मेंगडे हे महापालिकेत आल्याआल्या वादग्रस्त बनले होते. अधिकार नसताना त्यांनी महापालिकेच्या 135 कोटीच्या मॅच्युरिटी झालेल्या आणि 35 कोटीच्या न झालेल्या ठेवी एस. बँक या अलिकडेच वादग्रस्त बनलेल्या खासगी बँकेसह पाच बँकांमध्ये ठेवण्यात मोठी भूमिका बजावली होती. यामध्ये मुख्य आरोप आयएएस अधिकारी गुप्ता यांच्यावर असला तरी अधिकार काढून घेण्यात आलेल्या मेंगडे यांनी वसंतदादा शेतकरी बँकेतील ठेवीचा महापालिकेला दणका बसलेला आहे, हे माहिती असताना खासगी बँकेत ठेवी वळवण्यात वाटा उचलला आहे. या प्रकारात दीड कोटीचा महापालिकेला फटका बसला, असे वरवर सांगितले जात असले तरीही त्याहून अधिकचे हे आर्थिक नुकसान असणार आहे. चौकशी अंती कोणत्या प्रकरणात किती फटका बसला याची आकडेवारी पुढे येणार आहे.
संबंधित प्रकरणामध्ये मुख्य आरोप गुप्ता यांच्यावर लावले असले तरी मुख्य लेखाधिकारी म्हणून हे प्रकार रोखणे ही शासनाचा प्रतिनिधी म्हणून मेंगडे यांची जबाबदारी होती. उलट ते गैरप्रकारात सामील झाल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आलेला आहे. याशिवाय महापालिकेच्या ठेकेदारांची बिले देण्यात क्रमवारी पाळण्यात आली नाही. वशिल्याने कार्यालयाच्या बाहेरच्या बाहेर व्यवहार केले गेले. कार्यालयात नोंद करताना 17 प्रकारच्या नोंदी न करता, विलंबाची कारणे व इतर महत्वाच्या बाबींचा विचारही न करता केवळ नाव आणि बिलाची रक्कम इतक्याच माहितीवर ठराविकांची बिले काढली गेली. त्यासाठी चुकीच्या पध्दतीने रक्कम काढण्यात आली. अनेक व्यवहारांचा गुंता होईल अशा पद्धतीने व्यवहार केले गेले. हे करण्यास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांना वरिष्ठ अधिकारी आपल्यासोबत असून आपण त्यांच्या आदेशानेच हे सर्व करत आहे. तुम्हाला जर यामध्ये सामील व्हायचे नसेल तर महापालिकेच्या इतर विभागात बदलीवर जाण्याची तयारी ठेवा, अशी ंतंबी दिली असे अनेक आरोप आहेत.
याशिवाय अधिकारी, कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या भत्यांबाबत शासन आदेशाचे चुकीचे अर्थ लावून स्वत:सह 1300 लोकांना अधिकचे लाखो रूपये देऊ केल्याचे, कॅशबूक, बील रजिस्टर अपूर्ण ठेवल्याचे, कार्यादेश नोंदवही न ठेवल्याचे असे अनेक आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्याच्या वित्त विभागाच्या लेखा व कोषागार शाखेच्या प्रशासन सहसंचालक रश्मी नांदिवडेकर यांनी 11 जून रोजीच्या आदेशाने मेंगडे यांची चौकशी करण्याचे आदेश दिले असून हे आदेश सांगली महापालिकेला प्राप्त झाले आहेत. महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त आडसूळ यांना दिले असून ते याप्रकरणात किती गांभिर्याने शोध घेतात याकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
- मेंगडे यांच्यावर आरोप
1. अधिकर नसताना महापालिकेच्या ठेवी वळत्या करण्यात महत्वाचा वाटा उचलला
2. ठेकेदारांची बिले देण्यात क्रमवारी न पाळता कार्यालयाच्या बाहेरून व्यवहार
3. शासन आदेशांचे चुकीचे अर्थ लावून भत्ते लाटले, इतर 1300 लोकांना वाटले
4. अधिकार नसताना स्वत:चे कार्यालय वातानुकुलीत करून अधिकाराचा गैरवापर
5. अधिकारी, कर्मचाऱ्यांवर दबाव आणून चुकीच्या गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त केले
6. वरिष्ठांच्या आदेशाने सुरू कामात सहभागी न झाल्यास बदलीच्या धमक्या








