भारताचे प्रत्युत्तर बुद्धिमत्तापूर्ण अन् संतुलित
काँग्रेस नेते आणि माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी एका लेखात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारताकडुन पाकिस्तानला देण्यात आलेले प्रत्युत्तर ‘बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित’ संबोधिले आहे. 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशात सूड घेण्याचा आवाज तीव्र होता. परंतु सरकारने मर्यादित सैन्य कारवाईचा मार्ग निवडून एक मोठे युद्ध टाळले असल्याचे चिदंबरम यांनी म्हटले आहे.
भारताची सैन्य कारवाई मर्यादित आणि सुनियोजित होती. याचा उद्देश दहशतवादी तळांना नष्ट करणे होता. ही सैन्य कारवाई पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हुशारीने उचललेले पाऊल होते. कारण भारताने पूर्ण युद्धाची स्थिती टाळत जागतिक स्थिरतेला प्राथमिकता दिली असल्याचे म्हणत चिदंबरम यांनी कौतुक केले आहे.
जग सहन करू शकत नाही युद्ध
भारत आणि पाकिस्तान दोघेही अण्वस्त्रसज्ज देश आहेत. पूर्ण युद्ध केवळ क्षेत्री नव्हे तर जागतिक अस्थिरता निर्माण करू शकते. रशिया-युक्रेन आणि इस्रायल-गाझा संघर्ष पाता जग आता आणखी एक युद्ध सहन करू शकत नसल्याचे चिदंबरम यांनी स्वत:च्या लेखात म्हटले आहे.
कारवाईचे कौतुक
चिदंबरम यांनी सरकारच्या 7 मे रोजीच्या सैन्य कारवाईला ‘वैध आणि लक्ष्यकेंद्रीत’ संबोधिले. भारताने नागरी भागांवर, पाकिस्तानी सैन्यावर थेट हल्ला केला नाही. पाकिस्तानने भारतीय विमाने पाडविल्याचा दावा केला असला तरीही याचे पुरावे त्याला देता आलेले नाहीत. परंतु लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि द रेजिस्टेंस फ्रंट यासारख दहशतवादी संघटना पूर्णपणे संपल्या असे मानणे घाईचे ठरले. या संघटनांकडे नवे नेतृत्व निर्माण करण्याची क्षमता आहे आणि आयएसआयचे समर्थन अद्याप त्यांना मिळणार असल्याचे म्हणत चिदंबरम यांनी सतर्क राहण्याची सूचना केली आहे.









