हॉटेलच्या पायरवीर फय्याज हा चिकन 65 विकत होता
सातारा : शनिवार पेठ (सातारा) येथील लजिज बिर्याणी हाऊसच्या बाहेर विक्रीसाठी ठेवलेले चिकन 65 दोन युवक फुकट मागत होते. हे देण्यास हॉटेल मालकाने नकार दिला. याचा राग मनात धरून हॉटेलवर चौघांनी दगडफेक केली. याच वेळी रात्री परजावरील मशीदीत नमाज पठण करून सगळे बाहेर पडत असताना काही दगड मशीदीवर पडल्याने एकच गोंधळ उडाला. नक्की काय झाले हे कळण्याआतच अनेकांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
या घटनेची माहिती मिळताच डी.वाय.एस.पी राजीव नवले यांनी घटनास्थळी येऊन चार युवकांसह इतर पाच युवकांवर गुन्हा दाखल केला. अमोल चंदु खवळे, अजय नथु गायकवाड (दोन्ही रा. नामदेववाडी झोपडपट्टी सातारा), सुरज कांता दांडे (रा मोळाचा ओढा सातारा), ओमकार राजेंद्र पवार (रा. शुक्रवार पेठ सातारा) अशी त्याची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लजिज बिर्याणी हाऊसचे मालक मुक्तार शेरअली पालकर (वय 50, रा. शनिवार पेठ सातारा) हे त्यांचा पुतण्या अबरार पालकर असे दोघे शुक्रवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास हॉटेलवर होते. हॉटेलच्या पायरवीर फय्याज हा चिकन 65 विकत होता. यावेळी नामदेववाडी झोपडपट्टीतील अमोल खवळे व ओमकार पवार तेथे आले.
तो फय्याज याचे सोबत वाद घालु लागला म्हणून मुक्तार पालकर व अबरार यांनी फय्याजकडे काय झाले अशी चौकशी केली. यावेळी फय्याजने सांगितले की, अमोल खवळे हा चिकन 65 फुकट मागत होता. त्यावर मी त्याला पैसे दे म्हणुन सांगत असताना अमोल खवळे व ओमकार पवार असे चिकन 65 न घेता तिथून जाताना अमोल खवळे हा पोर घेऊन येतो मग तुम्हाला दाखवितो असे म्हणत गेला.
काही वेळातच अमोल खवळे व ओमकार पवार असे त्याचे सोबत अजय गायकवाड, सुरज दांडे व आणखी 5 ते 6 लोक सोबत घेऊन हॉटेलमध्ये आले. ते सर्वजण मुक्तार पालकर यांना तु आमच्याकडुन जेवणाचे पैसे घेणार काय, तु आम्हाला ओळखत नाहीस काय, तुझ हॉटेल चालु देणार नाही, तुला सोडणार नाही असे म्हणत, अबरारला शिवीगाळ, दमदाटी करित धक्काबुक्की करित होते.
त्यांनी हॉटेलमधील वस्तूंची तोडफोड करण्यास सुरुवात केली. म्हणुन मुक्तार पालकर व अबरार त्यांना हॉटेलमधुन बाहेर काढत होतो. त्यावेळी त्यांच्यापैकी एकाने मुक्तार यांच्या सदऱ्याच्या उजव्या बाजुच्या खिशात असलेले 2 दोन हजार रूपये काढुन घेतले. अजय गायकवाड हा गल्ल्यातील पैसे काढण्याचा प्रयत्न करू लागला.
त्याला विरोध करताच सगळ्यांनी हॉटेल बाहेर येऊन दगडफेक करायला सुरूवात केली. यातील एक अबरार याच्या उजव्या गालावर लागल्याने तो जखमी झाला आहे. हॉटेलच्या समोरील रस्त्याने जाणारा साबीर आदम शेख (रा 636 गुरुवार पेठ सातारा) याच्या मानेवर, पाठीत दगड लागुन तो जखमी झाला.
मशीदीवरही केली दगडफेक
दगडफेक करून पळून जाताना अमोल खवळे, अजय गायकवाड, सुरज दांडे, ओमकार पवार व इतर पाच जणांनी परजावरील मशीदीवर दगड फेकले. याच वेळी नमाज पठण करून मुस्लिम बांधव मशीदीबाहेर पडत होते. तोच दगड लागल्याने एकच गोंधळ उडाला.
सगळे पळु लागले, आरडाओरडा करू लागले. यामुळे एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती सातारा शहर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी व डी.वाय.एस.पी राजीव नवले यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत काही मुस्लिम बांधंव हे पोलीस ठाण्याच्या परिसरात जमले होते.
अवघ्या काही तासांत चौघांना अटक
लजिज बिर्याणी हाऊसे मुक्तार पालकर यांनी घडलेल्या प्रकारबद्दल चौघांविरूद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून अवघ्या काही तासांत चौघांनाही अटक केली आहे. पोलिसांनी तात्काळ अॅक्शन घेतल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. परंतु ठोस माहिती नसल्याने या घटनेवर उलट सुलट चर्चा सुरू होत्या.








