कोल्हापूर :
शनिवारी बहिण-भावांच्या नाते दृढ करणारा रक्षाबंधन सण साजरा होत आहे. याच पार्श्वभूमीवर बाजारपेठे राख्यांचा झगमगाट दिसून येत आहे. वविशेषत: लहानग्यांसाठी आकर्षक कार्टून कॅरेक्टर राख्या उपलब्ध झाल्याने विक्रेत्यांकडे या राख्या खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे.
यंदा बाजारात मोटू-पतलू, छोटा भीम, डोरेमॉन, पिकाचू, स्पायडरमॅन, बेन टेन, बॅटमॅन, यांसारख्या कार्टून कॅरेक्टर राख्या ग्राहकांच्या विशेष पसंतीस उतरत आहेत. लहान मुलांना या राख्या खूप आवडत असल्यामुळे पालक त्यांच्यासाठी आवर्जून या राख्या खरेदी करत आहेत.
राख्यांच्या किंमतींबाबत बोलायचे झाले तर साधरणत: 60 रूपयांपासून सुरू होऊन अगदी 200 रूपयांपर्यत या राख्या बाजारात उपलब्ध आहेत. काही राख्या लाइटसह तर काही किचनसह असल्याने किंमत तुलनेने जास्त आहे.
लहान मुलांना आवडेल अशा डिझाईनमूळे या राख्यांना मागणी खूप वाढली आहे. याशिवाय पारंपारिक राख्या, मोत्यांच्या राख्या आणि हाताने बनवलेल्या राख्यांचीही मागणी कायम आहे. मात्र कार्टून कॅरेक्टर राख्या सर्वाधिक लोकप्रिय ठरत आहेत. रक्षाबंधनाची उत्सुकता आणि आकर्षक राख्यांच्या नव्या डिझाईन्समुळे बाजारपेठा उजळल्या आहेत. मुलांच्या आवडत्या कार्टून कॅरेक्टर राख्यांनी विक्रेत्यांच्या विक्रीतही चांगली भर घातली आहे. सणाचा आनंद वाढवण्यासाठी ग्राहक उत्साहाने खरेदी करताना दिसत आहेत.
- कार्टून कॅरेक्टर राख्यांना चांगली मागणी
दरवर्षीप्रमाणे यंदाही राख्यांची चांगली मागणी आहे. यंदा मुलांसाठी खास कार्टून कॅरेक्टर राख्या बाजारात आणल्या आहेत त्यासोबत खास वैशिष्टे म्हणजे या राख्यांसोबत किचनही उपलब्ध आहे. या राख्या केवळ आकर्षक नाहीत तर लहान मुलांना त्यांच्या आवडत्या कॅरेक्टरसह सण साजरा करण्याची मजा मिळते. किंमतीही परवडवणाऱ्या आहेत, त्यामूळे ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे.
-जावेद पटवकेर, राखी विक्रेते
- रक्षाबंधनाची उत्सुकता शिगेल
रक्षाबंधन हा भावा-बहिणीच्या प्रेमाचा सण असून, राखी ही त्याची ओळख आहे. त्यामुळे राख्या खरेदीसाठी लगबग दिसत आहे. ऑनलाइन प्लॅटफॉरर्मवर देखील राख्यांची खरेदी सुरू आहे. मात्र स्थानिक बाजारपेठेत प्रत्यक्षात पाहून आणि आवड निवड करून राख्या खरेदी करण्याला ग्राहकांचा जास्त कल आहे.








