पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान अल्बानेस यांच्या हस्ते सिडनीतील उपनगराचे नामकरण
► वृत्तसंस्था/ सिडनी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताला सुखावह वाटावी अशी घटना घडली आहे. या देशातील महत्वापूर्ण अशा सिडनी शहराचे एक उपनगर ‘हॅरीस पार्क’चे नामकरण ‘छोटा भारत’ असे करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथोनी अल्बानेस यांच्या हस्ते हे नामकरण झाले. अल्बानेस यांनी पंतप्रधान मोदींचाही उल्लेख ‘बॉस’ असा केला.
विदेशातील एखाद्या भागाला ‘छोटा भारत’ (लिटिल इंडिया) असे नाव देण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असावी, असे बोलले जात आहे. या नामकरणाची घोषणा अल्बानेस यांनी स्वत: केली. त्यांनी पंतप्रधान मोदींचे सिडनीत स्वागत केले. यावेळी या शहरातील भारतीय वंशाचा समुदाय येथे मोठ्या संख्येने उपस्थित होता. या समुदायाकडून इंडिया इंडिया, मोदी मोदी अशा घोषणा देण्यात आल्या.
त्यांचे नेहमीच जोषात स्वागत
पंतप्रधान मोदी हे ‘बॉस’ असून ते नेहमी जेथे जातील तेथे त्यांचे एखाद्या रॉक स्टारच्या थाटात भव्य आणि जोषपूर्ण स्वागत केले जाते, असे कौतुकोद्गार यावेळी अल्बानेस यांनी काढले. या उद्गारांना उपस्थित लोकांनी मोठा प्रतिसाद दिला. आपल्या अशा अनोख्या स्वागतासाठी पंतप्रधान मोदी यांनी अल्बानेस आणि ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायाचे मन:पूर्वक आभार मानले.
चाट आणि जिलेबी
कार्यक्रमानंतर दोन्ही नेत्यांनी छोटा भारत या उपनगरातील एका भारतीय मिठाई केंद्रालाही भेट दिली. तेथे त्यांनी चाट आणि जिलेबीं या पदार्थांचा आस्वाद घेतला. त्यांनी येथील एका सार्वजनिक स्थानी भारतीय समुदायाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात या समुदायाला उद्देशून भाषण केले. मास्टरशेफ आणि क्रिकेट या दोन विषयांमुळे भारत आणि ऑस्टेलिया या दोन देशांमध्ये विशेष दृढ संबंध प्रस्थापित झाले आहेत. मास्टरशेफ हा ऑस्ट्रेलियातील एका टीव्ही वाहिनीवरुन दाखविला जाणारा एक लोकप्रिय कार्यक्रम असून या कार्यक्रमात अनेकदा भारतीयांचाही सहभाग असतो. त्यामुळे या कार्यक्रमाचा उल्लेख करण्यात आला.
भारतीयांचे योगदान प्रशंसनीय
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील संबंध हे येथील भारतीय समुदायामुच्या योगदानामुळे अधिक दृढ झाले आहेत. एकेकाळी कॉमनवेल्थ, क्रिकेट आणि करी या तीन ‘सी’मध्ये भारत अणि ऑस्ट्रेलिया यांच्या संबंधांचे वर्णन केले जात असे. पण, ती वरवरची व्याख्या असून येथींल भारतीय समुदायाचे प्रयत्न आणि काम यांच्यामुळे खरेतर हे दोन्ही देश एकमेकांच्या जवळ आले आहेत. हे योगदान असेच सुरु राहू द्या, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी भारतीय समुदायाला केले.
योगामुळे संलग्नता
भारतात उगम पावलेले योगशास्त्र आता ऑस्ट्रेलियात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. योगामुळे या दोन देशांमधींल संलग्नता अधिक वाढत आहे. येथे आंतरराष्ट्रीय योगदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परस्पर विश्वास आणि परस्पर सन्मान या दोन बाबींवर कोणत्याही दोन देशांमधील संबंध दृढ होत असतात. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांची संस्कृती आणि जीवनशैली कितीही भिन्न असली तरी हेच दोन मुद्दे त्यांना एकत्र आणण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत, असे प्रतिपादन त्यांनीं त्यांच्या भाषणात केले.
ब्रिस्बेनमध्ये होणार दूतावास
ब्रिस्बेनमध्ये लवकरच भारताचा व्यापारी दूतावास स्थापन केला जाईल. यामुळे दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध अधिक बळकट होतील. येत्या दहा वर्षांमध्ये दोन्ही देशांच्या परस्पर व्यापारात मोठी वाढ होणार आहे. यासाठी दोन्ही देश सज्ज आहेत, अशी घोषणाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
भारताची प्रगती वैशिष्ट्यापूर्ण
कोरोनाच्या आव्हानात्मक काळातही भारताने स्पृहणीय आर्थिक प्रगती साधली आहे. गेल्या वर्षी भारताची निर्यात विक्रमी पातळीवर पोहचली आहे. हे भारतीयांच्या कष्टाचे फळ आहे. कोरोनाच्या झाकोळात जगाची अर्थव्यवस्था असतानाही भारताने उत्साहवर्धक विकासदर गाठला आहे. आज भारत जगातील सर्वाधिक तरुणांची संख्या असणारा देश बनला आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.









