अमित शाह यांचे बस्तर येथे वक्तव्य : नक्षलवाद पूर्णपणे संपुष्टात आणणार
वृत्तसंस्था /बस्तर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे गुरुवारी छत्तीसगडच्या दौऱ्यावर होते, यादरम्यान त्यांनी बस्तर येथील जगदलपूर आणि कोंडागावमध्ये जाहीरसभांना संबोधित केले आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारच्या 9 वर्षांच्या कार्यकाळात नक्षली हिंसेच्या घटनांमध्ये 52 टक्क्यांची घट झाली आहे. राज्यात भाजप सत्तेवर आल्यास पूर्ण छत्तीसगडला नक्षलवादाच्या धोक्यापासून मुक्त करण्यात येणार असल्याचे शाह म्हणाले. छत्तीसगड तीनवेळा दिवाळी साजरी करणार आहे. एक सामान्य तिथीनुसार, दुसरी दिवाळी 3 डिसेंबर रोजी भाजप राज्यात सत्तेवर आल्यावर आणि तिसरी दिवाळी जानेवारीमध्ये अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेवेळी साजरी केली जाणार असल्याचे शाह यांनी म्हटले आहे. जाहीर सभेला संबोधित करण्यापूर्वी शाह यांनी जगदलपूर येथील दंतेश्वरी मंदिरात पूजा केली.
पंतप्रधान मोदींनी डिस्ट्रीक्ट मिनरल फंड तयार केला असून याच्या अंतर्गत मागील 9 वर्षांमध्ये 75 हजार कोटी रुपये जिल्ह्यांच्या विकासावर खर्च करण्यात आले आहेत. याच्या अंतर्गत पेयजल, प्राथमिक शिक्षण, गोशाळांचा विकास आणि प्रत्येक घरात वीज पोहोचविण्याचे काम करण्यात आले आहे. नरेंद्र मोदींनी आदिवासी कल्याणाकरता 1 लाख 32 हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. देशभरातील आदिवासींच्या सन्मानार्थ मोदींनी अनेक कामे केली आहेत. जल, जंगल आणि जमिनीच्या रक्षणासोबत आदिवासी बंधूभगिनींना सुरक्षा, सन्मान आणि समावेशक विकास देण्याचे काम मोदी सरकारने केले असल्याचा दावा शाह यांनी केला आहे. देशात केवळ भाजपमध्येच उमेदवारीसाठी आडनाव विचारले जात नाही आणि बँक खात्यात किती रक्कम आहे हे पाहिले जात नाही. 5 ही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय होणार असल्याचे शाह यांनी म्हटले आहे.









