कोट्यावधी रुपये दिल्याची महादेव अॅपच्या चालकाची कबुली
► वृत्तसंस्था / रायपूर
छत्तीसगड विधानसभा निवडणुकीतील मतदानाचा प्रथम टप्पा तोंडावर आला असतानाच महादेव अॅप घोटाळ्याने मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेश बघेल यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. बघेल यांना आपण कोट्यावधी रुपये दिले असल्याची कबुली महादेव अॅपचा संचालक आणि मालक शुभम सोनी याने दिल्याने बघेल आणि काँग्रेसवर बचावात्मक पवित्रा घेण्याची वेळ आली आहे.
महादेव अॅपच्या माध्यमातून बेटींगचा बेकायदेशीर व्यवहार छत्तीसगड आणि इतर राज्यांमध्ये फोफावला होता. त्यानंतर ईडी आणि सीबीआय यांच्या कारवाईत या अॅपचा पर्दाफाश करण्यात आला. या अॅपवर आता बंदी घालण्यात आली आहे. तसेच या अॅपचा मालक आणि संचालक शुभम सोनी याला अटक करण्यात आली आहे. त्याने छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना 503 कोटी रुपये बेहिशेबी पद्धतीने दिल्याची कबुली दिली आहे. या रकमेच्या मोबदल्यात बघेल आणि त्यांच्या सरकारने महादेव अॅपच्या व्यवसायाला फोफावण्यास साहाय्य केले, असेही सोनी याने स्पष्ट केले आहे. यामुळे काँग्रेसला सारवासारवी करावी लागत आहे.
बघेल यांच्या सल्ल्याने स्थानांतर
भूपेश बघेल यांच्या सल्ल्यावरुनच आपण आपला बेकायदेशीर व्यवसाय भारतातून दुबईला हलविला होता. भारतातून व्यवसाय केल्यास ईडी आणि सीबीआयच्या कचाट्यात हा व्यवसाय केव्हाही अडकू शकतो. त्यामुळे एका सुरक्षित स्थानातून तो केल्यास कारवाईची चिंता उरणार आही, अशी खात्री असल्याने बघेल यांच्या सूचनेवरुन व्यवसायाचे स्थानांतर करण्यात आले. इतरही अनेक मुद्द्यांवर मुख्यमंत्री बघेल सल्ला देत होते, असे सोनी याने स्पष्ट केले.
काँग्रेसकडून इन्कार
महादेव अॅप प्रकरण हे भाजपचेच कारस्थान आहे. मुख्यमंत्री बघेल यांचा या घोटाळ्याशी काहीही संबंध नसून ते या व्यक्तीला भेटलेले नाहीत किंवा त्याला ओळखतही नाहीत. काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याचा या प्रकरणात सहभाग नाही. तथापि, छत्तीसगडमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने मुख्यमंत्री बघेल यांना अडचणीत आणण्यासाठी हा बनाव रचल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
महादेव अॅप प्रकरण काय?
महादेव अॅप हे बेटींग करणे सोयीचे आणि वेगवान करणे सोयीचे व्हावे म्हणून निर्माण करण्यात आलेले अॅप आहे. शुभम सोनी हा त्याचा मालक आहे. पण पडद्याआडचे सूत्रधार वेगळेच लोक असावेत अशा संशय आहे. दुबईतील तस्करांच्या टोळ्यांशीही या अॅप प्रकरणाचा संबंध असल्याचा आरोप आहे. या मोबाईल अॅपवरुन हजारो कोटी रुपयांचा हवाला आणि बेटींगचा बेकायदेशीर व्यवसाय केला जात होता. ईडीने हे प्रकरण उघडकीस आणले. छत्तीसगडमधील सत्ताधारी काँग्रेस पक्षातील काही नेत्यांचा या अॅपच्या व्यवसायाशी संबंध असल्याचे ईडीचे म्हणणे आहे. सोनी याला अटक झाली असून त्यानेच दिलेल्या कबुलीच्या आधारावर या प्रकरणाच्या सखोल चौकशीचा आरंभ करण्यात आला आहे. सोनी याने मुख्यमंत्री बघेल यांना 500 कोटींहून अधिक रक्कम दिल्याचे मान्य केल्याने या प्रकरणाचा संबंध थेट मुख्यमंत्री बघेल यांच्याशी जोडला गेला आहे. बघेल यांचीही चौकशी ईडीकडून होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









