महादेव सट्टेबाजी अॅपप्रकरणी होता तुरुंगात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
छत्तीसगडमधील व्यावसायिक सुनील दम्मानी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी त्यांना जामीन मंजूर केला आहे. दम्मानी यांना मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात ईडीने अवैध महादेव अॅपशी निगडित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक केली होती.
जर अन्य कुठल्याही तपासात दम्मानी यांची आवश्यकता नसेल तर त्यांना जामिनावर मुक्तता करण्याचा आदेश देण्यात येत आहे. दम्मानी यांना संबंधित जिल्ह्यातील ईडी कार्यालयात दर 15 दिवसांनी हजेरी नोंदवावी लागणार आहे. तसेच कनिष्ठ न्यायालयाच्या अनुमतीशिवाय दम्मानी यांना देश सोडता येणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
दम्मानी यांच्यावर अवैध अॅपच्या माध्यमातून मिळविण्यात आलेली 5 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम अवैधमार्गाने विदेशात पाठविण्याचा आरोप आहे. मुख्य सूत्रधार फरार असून त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आल्याचे म्हणत ईडीने जामीन अर्जाला विरोध दर्शविला होता. मागील वर्षी 23 ऑगस्ट रोजी ईडीने महादेव अॅपशी निगडित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी दम्मानी आणि तीन जणांना अटक केली होती.