वृत्तसंस्था/ सुकमा
छत्तीसगडमध्ये नक्षलवादविरोधी मोहिमेत पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. नक्षलवादाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सुकमामध्ये 16 नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये 2 कट्टर नक्षलवाद्यांचा समावेश आहे. त्याव्यतिरिक्त 6 नक्षलवाद्यांवर 25 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. याशिवाय, एका महिला आणि एका पुरुष माओवाद्यावर प्रत्येकी 8 लाख रुपयांचे बक्षीसही ठेवण्यात आले होते.
सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद संपवण्याच्या मोहिमेत पोलीस आणि सीआरपीएफकडून सुरू असलेल्या सततच्या प्रयत्नांमुळे प्रभावित होऊन सोमवारी 16 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलेल्या 16 नक्षलींपैकी बहुतांश जणांनी या भागात अनेकवेळा मोठे गुन्हे केले आहेत. नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण धोरण आणि नियाद नेल्ला नर योजनेअंतर्गत आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला. याप्रसंगी पोलीस अधीक्षक किरण चव्हाण, एसएसपी उमेश गुप्ता आणि सीआरपीएफसह अनेक पोलीस अधिकारी उपस्थित होते.









