कराड / प्रतिनिधी :
सातारा येथे बुधवारी बाजार समितीच्या जागेवरून खासदार छ. उदयनराजे भोसले व आमदार छ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह समर्थकांत राडा झाल्याने तणावपूर्ण वातावरण आहे. दरम्यान गुरूवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कराडला होते. याप्रसंगी सकाळी खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीला उपस्थिती लावली.
कराड येथील कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्रामगृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी रात्री मुक्कामी आले. बुधवारी सातारा येथे खासदार व आमदार गटात बाजार समितीच्या भुमिपुजनाच्या कारणावरून राडा झाला. यावरून सातारा येथे राजकीय तणाव निर्माण होऊन पोलीस बंदोबस्त वाढला होता. दोन्ही राजांमधील तणाव कायम असतानाच त्यांनी गुरूवारी कराड दौरा करत असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सकाळी साडेआठच्या सुमारास कृष्णा ट्रस्टच्या विश्रामगृहात भेट घेतली. स्वतंत्रपणे ही भेट सुरू होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी चर्चा केली. उशीरापर्यंत ही चर्चा सुरू होती. उपमुख्यमंत्र्यांच्या या चर्चेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या चर्चेतून काय तोडगा निघणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या.








