1949 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात : गुरुवारी गणेश मूर्तीचा आगमन सोहळा
बेळगाव : गल्लीतील नागरिक धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक हेतूने एकत्रित यावेत, या उद्देशाने छत्रपती शिवाजी रोड, कोनवाळ गल्ली येथील युवकांनी 1949 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली. अतिशय लहान जागेतून सुरू झालेला हा गणेशोत्सव यावर्षी अमृतमहोत्सव साजरा करत आहे. या गणेशोत्सवाने बेळगावमधील अनेक कलाकार, सामाजिक कार्यकर्ते, रंगकर्मी घडविले. गणेशोत्सवातून तयार झालेला आठवण लेझीम मेळा, झांजपथक, गजराज ढोलताशा पथक व क्रिकेट संघाने नावलौकिक मिळवला. 1949 मध्ये रिक्षा व्यावसायिक बाबुराव देवाप्पा देसूरकर यांनी मेहनत घेऊन गणेशोत्सवाला प्रारंभ केला.
पुढीलवर्षी रेडिओ कॉम्प्लेक्ससमोरील जागेत गणेशोत्सव साजरा झाला. 1950 नंतर गणेशमूर्ती छत्रपती शिवाजी रोड येथील चौकात बसविण्यात येऊ लागली. श्रीकांत मुचंडी, वसंत मुचंडी, कृष्णा नावगेकर, विजय आपटेकर, माणिकराव अष्टेकर, परशुराम पाटील, कृष्णा हंडे, नागेश मायाण्णाचे, नारायण आंबेवाडीकर, परशराम पासलकर, विठ्ठल हंडे, संभाजी सावंत, गजानन नावगेकर अशा मंडळींनी गणेशोत्सव पुढे नेला. गणेशोत्सवातूनच पुढे गल्लीत गणेश मंदिरही साकारण्यात आले. माणिकराव अष्टेकर कुटुंबीयांकडून प्रतिवर्षी गणेशोत्सवासाठी वाहनाची चेसी दिली जाते. मागील 75 वर्षांमध्ये मंडळाने अनेक सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम राबविले आहेत. यामुळेच बेळगावमधील एक प्रमुख गणेश मंडळ म्हणून छत्रपती शिवाजी रोड, कोनवाळ गल्ली येथील गणेश मंडळाकडे पाहिले जाते.
अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रम
मंडळाचे यावर्षी अमृतमहोत्सवी वर्ष असल्याने विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. गुरुवार दि. 5 रोजी गणेशमूर्तीचा आगमन सोहळा होणार आहे. त्याचबरोबर गणेशोत्सवाच्या काळात दररोज प्रसाद तसेच सांस्कृतिक कार्यक्रम केले जाणार आहेत. यावर्षी नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली असून अध्यक्ष विनायक पवार, उपाध्यक्ष सोमनाथ अष्टेकर व मनोज नावगेकर, खजिनदार महेश नावगेकर, प्रशांत आंबेवाडीकर, उपखजिनदार सूरज अष्टेकर, सूरज चौगुले, सेक्रेटरी धोंडिबा अष्टेकर, निखिल नरसगौडा, उपसेक्रेटरी महादेव पोटे, राजू गवळी, हिशेब तपासनीस मनोहर लोकुळकर व राजू नरसगौडा.
75 वर्षांपासून एकच मूर्तिकार
मंडळाचे यावर्षी अमृतमहोत्सवी वर्ष आहे. 1949 ते 2024 अशा 75 वर्षांच्या कालावधीत या मंडळाने एकाच मूर्तिकाराकडून श्रीमूर्ती तयार करून घेतल्या आहेत. बेळगावचे मूर्तिकार जे. जे. पाटील व त्यांच्या कुटुंबीयांकडून दरवर्षी गणेशमूर्ती तयार करून घेतली जाते. नवीन युवकांनी हाच पायंडा पुढे ठेवला आहे.









