श्रीराम सेना हिंदुस्थानतर्फे अखंड हिंदुस्थान संकल्प दिन
बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराज हे दूरदृष्टी असणारे राजे होते. इंग्रज, डच, पोर्तुगीज हे समुद्री मार्गे देशात आले. त्यामुळे आपल्या स्वराज्याच्या दर्यावर आपले नियंत्रण असावे, म्हणून त्यांनी आपले आरमार उभे केले. सम्राट चंद्रगुप्तानंतर स्वत:चे आरमार उभे करणारा देशातील एकमेव राजा म्हणून छत्रपतींचा गौरव होतो, असे उद्गार शिवव्याख्याते प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी काढले. श्रीराम सेना हिंदुस्थानच्यावतीने बुधवारी अखंड हिंदुस्थान संकल्प दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचे व्यक्तिमत्त्व उलगडून देताना प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी इतिहासाचे दाखले दिले. व्यासपीठावर अॅड. शामसुंदर पत्तार, निपाणी येथील विरुपाक्ष लिंग समाधी मठाचे पपू. प्राणलिंग स्वामीजी, श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, रणजित चव्हाण-पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये निवृत्त सुभेदार मेजर कॅ. कृष्णा शहापूरकर, पुंडलिक तरळे, कृष्णा पाटील, धाकलू केदार, सयाजी पाटील, कृष्णा मजुकर, पिराजी तरळे, मनोहर कडेमनी, सिद्धाप्पा पाटील, शंकर चौगुले यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.
महाराजांच्या हयातीतील पहिले शिल्प बेळगावमध्ये
छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण मोहिमेवर असताना त्यांच्या सैनिकांनी बेळवडी मल्लम्मा यांच्या सैन्यावर हल्ला केला. त्यावेळी पराभूत झालेल्या मल्लम्मांना कैद करून शिवाजी महाराजांसमोर आणण्यात आले. त्यावेळी मल्लम्मांच्या लहान मुलाला पाहून छत्रपतींनी त्याला आपला भाचा असे संबोधित करत दूध पिऊ घातले. याचीच आठवण म्हणून बेळगावजवळच्या यादवाड मारुती मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज हयातीत असताना त्यांचे शिल्प दगडात कोरण्यात आले. त्यामुळे बेळगाव हे देखील इतिहासाचे साक्षीदार असलेले गाव आहे, असा उल्लेख बानुगडे-पाटील यांनी केला.









