अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची मागणी
प्रतिनिधी / पणजी
छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचेच नव्हे, तर जगाचे भूषण आहे. छत्रपती शिवरायांनी देशातील प्रत्येक घटकासाठी केलेले कार्य हे आजही प्रेरणादायी असेच असल्याने अशा ह्या महापुऊषाची जयंती गोवा राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांत साजरी व्हावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या गोवा गटाने केली आहे.
पणजीत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला अभाविपचे राष्ट्रीय महामंत्री याज्ञवल्क्य शुक्ल, गोवा संजोयक धनश्री मांद्रेकर, उत्तर गोवा संयोजक सुदीप नाईक, पणजी महानगरमंत्री वैभव साळगावकर, म्हापशातील सेंट झेवियर्स महाविद्यालयाचे जीएस साहील महाजन उपस्थित होते.
याज्ञवल्क्य शुक्ल म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य व निती ही देशासाठी आजही फलदायी ठरत आहे. शिवाजी महाराजांचे विचार आणि आचरण हीच देशाची संस्कृती ठरते. त्यामुळे त्यांची जयंती सर्वत्र साजरी व्हावी, यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पुढाकार घ्यावा. याबाबत राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनाही याबाबत माहिती देण्यात आल्याचे शुक्ल यांनी सांगितले.
साहील महाजन यांनी सांगितले की, म्हापसा सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या प्रशासनाकडे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्याबाबत मागणी करण्यात आली होती. परंतु ती पूर्ण न झाल्याने अशा उत्सवांना परवानगी मिळायला हवी, असेही ते म्हणाले.









