योगऋषी रामदेव बाबा यांचे गौरवोद्गार
फोंडा : अखंड भारतवर्षाचे पहिले स्वप्न छत्रपती शिवरायांनी पाहिले. त्याच्या पूर्ततेसाठी हिंदवी स्वराज्य उभारले. ही प्रेरणा घेऊनच पुरुषार्थ व सामर्थ्याच्या जोरावर संपूर्ण विश्वात भारताला महाशक्ती बनवायचे आहे. शिवाजी महाराज हे केवळ मराठा राजे नव्हते तर संपूर्ण भारतवर्षाचे आदर्श सम्राट होते. एका अर्थाने आजच्या पिढीचे ते खरे सुपर हिरो आहेत, असे गौरवोद्गार योगगुरु रामदेव बाबा यांनी काढले. फर्मागुडी येथील शिवजयंती सोहळ्यात रामदेवबाबांच्या अनपेक्षित उपस्थितीने शिवप्रेमींमध्ये अधिक उत्साहाचा माहोल संचारला. मुख्य कार्यक्रमाच्यावेळी प्रमुख वक्ते इतिहासकार अमर अडके यांचे भाषण सुरु असतानाच तपोभूमीचे पीठाधीश प. पू. ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी व आचार्य बालकृष्ण यांच्यासह रामदेवबाबांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले व उपस्थित शिवप्रेमींनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, कृषीमंत्री रवी नाईक, कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे, सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, वीजमंत्री सुदिन ढवळीकर व अन्य मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
शिवराय समस्त भारतीयांचा अभिमान
रामदेवबाबांची उपस्थिती ही यंदाच्या शिवजयंती सोहळ्याचे वेगळे वैशिष्ट्या ठरले. आपल्या ओघवत्या शैलीतील भाषणात रामदेवबाबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे गुणगान करताना शिवराय हे भारतीयांचा अभिमान असल्याचे सांगितले. विविध जाती, वर्ग व धर्मातील लोकांना एका सुत्रात बांधण्याचा यशस्वी प्रयोग करणारे ते दूरदृष्टीचे राज्यकर्ते होते. शिवरायांचा हाच आदर्श नवीन पिढीने घ्यावा व येणाऱ्या काळात भारताला जगाचे नेतृत्व करण्यासाठी सिद्ध करावे असे आवाहन केले. राष्ट्रवाद हेच चोख उत्तर छत्रपती शिवराय यांनी हिंदू धर्मीयांना स्वाभिमान व पराक्रम शिकविला. हिच प्रेरणा घेऊन विविध क्षेत्रात भारताला नेतृत्व करायचे आहे. सध्या जगात जो राजकीय, धार्मिक व सांस्कृतिक दहशतवाद माजवला जात आहे, त्याला राष्ट्रवाद हेच चोख उत्तर असल्याचे रामदेवबाबा म्हणाले.









