तीर्थकुंडये गावात उभारण्यात येणाऱ्या शिवमूर्तीचे ठिकठिकाणी भव्य स्वागत : ढोलताशा-पारंपरिक वाद्यांचा गजर : महिलांची लक्षणीय उपस्थिती
वार्ताहर /किणये
तीर्थकुंडये गावात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची मिरवणूक सोमवारी मोठ्या उत्साहात व जल्लोषात काढण्यात आली. दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर बेळगाव येथून या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. प्रारंभी देवस्थान पंचकमिटीचे उपाध्यक्ष सिद्धराम जांबोटी यांच्याहस्ते शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. तीर्थकुंडये गावात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शाखा तीर्थकुंडये व ग्रामस्थ यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती उभारण्यात येणार असल्यामुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कपिलेश्वर मंदिराच्या बाजूला भरत कुंभार यांनी 12 फूट अश्वारूढ आकर्षक शिवरायांची मूर्ती बनविली आहे. या शिवरायांच्या मूर्तीसाठी खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांचे सहकार्य लाभले आहे. सोमवारी टाळमृदंग व ढोल-ताशांच्या गजरात कपिलेश्वर मंदिर येथून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. या मिरवणुकीत तरुणांनी पांढरे कुर्ते व डोक्यावर भगवे फेटे परिधान केले होते. तसेच महिला व मुलींनी पारंपरिक वेशभूषा परिधान केल्या होत्या. या मिरवणुकीत महिलांची लक्षणीय अशी उपस्थिती दिसून आली. मिरवणूक सुरू असताना कौलापुरवाडा येथील वडिलधारी मंडळींनी केलेला ढोल-ताशांचा गजर मिरवणुकीचे आकर्षण वाढवित होता. ही मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, उद्यमबाग, पिरनवाडी, व्हीटीयू, संतीबस्तवाडमार्गे सोमवारी सायंकाळी उशीरा तीर्थकुंडये गावात आली. यावेळी या मिरवणुकीत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तीर्थकुंडये शाखेचे अध्यक्ष महादेव कुंभार, रमेश परीट, पुंडलिक खामकर, महादेव काकतकर, बसवराज पाटील, सतेश बोंडेकर, संभाजी तारिहाळ, रवी पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.









