१६ मेरोजी होणार लोकार्पण सोहळा
राधानगरी/प्रतिनिधी (महेश तिरवंडे)
रयतेचे राजे शाहू महाराज यांनी कोल्हापूर जिल्हा सुजलाम सुफलाम व्हावा, औद्योगिक व हरितक्रांती घडवावी या उद्देशाने 1909 साली देशातील पहिले धरण बांधले. मात्र या धरणस्थळावर छ. शाहू महाराजांच्या कार्य कर्तृत्वचा नामफलक आजतागायत नव्हता. या संदर्भात माजी जि प सद्यस्य आणि गोकुळ संचालक अभिजित तायशेटे यांनी धरणस्थळावर स्मारक उभारण्यात यावे यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. या संदर्भात 2015 साली जिल्हा परिषदेत ठराव करून 40 लाख रुपये मंजूर केले. मात्र शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे हे काम रखडले होते. अखेर बुधवार दि. 4 जानेवारी 2017 साली माजी आमदार छ. मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. तर १६ मे २०२२ रोजी राधानगरी धरण स्थळावर छ.शाहू महाराज स्मारकाचा लोकार्पण सोहळा होणार आहे. या सोहऴ्याला मंत्री आदित्य ठाकरे यांची उपस्थिती असणार आहे.
छ. शाहू महाराज स्मारकासाठी जलसंपदा विभागाकडे गट क्रमांक161/227/228 या पैकी एका ठिकाणी 860 चौरस मीटर इतक्या जागेची मागणी केली होती. तत्कालीन जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी या जागेस भेट देऊन परवानगी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार स्मारक उभारणी साठीचा प्रस्ताव कार्यकारी अभियंता जलसंपदा विभागाकडून कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे सादर करण्यात आला. मात्र जून 2016 साली नियामक मंडळाच्या बैठकीत कारण दाखवून हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला. या निर्णया विरोधात शाहू प्रेमी जनतेने नाराजी व्यक्त केली. 25 जून 2016 साली राधानगरी शहर बंद व यावेळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची दखल घेऊन आ. प्रकाश आबिटकर व खा. संभाजीराजे व अभिजीत तायशेटे यांनी शासन दरबारी वारंवार पाठपुरावा करून या स्मारकाला मंजुरी दिली.
दुसऱ्या टप्प्यात जिल्हा नियोजन मंडळाकडून 1 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून या स्मारकाला उजाळा देण्यात आला.गेली दोन वर्षे कोरोनाच्या महामारी मुळे या स्मारकाचे काम रखडले होते. मात्र सहा महिन्यांपासून पुन्हा एकदा या कामास गती देऊन स्मारकाचे काम पूर्णत्वास आले आहे.
सोमवार दि, 16 मे रोजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा भव्यदिव्य अश्या स्वरूपात साजरा होत आहे, या स्मारकाचा लोकार्पण सोहळ्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, खासदार छ. संभाजीराजे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक नेते, लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या लोकार्पण सोहळ्यास जिल्ह्यातील शाहू प्रेमी जनतेने मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावे असे आवाहन अभिजित तायशेटे यांनी केले आहे.
सध्या जलसंपदा विभागाकडे 13 एकर जमीन रिकामी असून भविष्यात याठिकाणी म्हैसूरच्या धर्तीवर बागबगीचा, वॉटर स्पोर्ट्स, लेझर शो, आदी नाविन्यपूर्ण योजना करण्याचा मानस असून यासाठी पर्यटन विभागाकडून भरीव निधी उपलब्ध करून घ्यावा अशी मागणी केली आहे, जेणेकरून राधानगरीच्या विकासात व वैभवात भर पडून पर्यटन वाढीस चालना मिळेल. – अभिजित तायशेटे, अध्यक्ष, छ. शाहू महाराज स्मारक समिती









