प्रतिनिधी, कोल्हापूर
स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याचा निर्णय घेऊन, शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्राच्या तेजस्वी इतिहासाचा अभिमानास्पद वारसा पुढे नेला आहे, अशा शब्दांत भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे.
राष्ट्रपुरुष आणि थोर व्यक्तींच्या जयंतीदिनी, शासकीय-निमशासकीय कार्यालयांत राष्ट्रीय दिन साजरा केला जातो. या यादीत छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीदिनाचा समावेश करून, सरकारने संभाजीराजांच्या अद्वितीय पराक्रमी इतिहासाचा सन्मान केला आहे, असे खासदार धनंजय महाडिक म्हणाले. 14 मे रोजी राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांत छत्रपती संभाजीराजांचा जयंतीदिन सोहळा,मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल असे ते म्हणाले.स्वराज्यरक्षक धर्मवीर संभाजी महाराजांचे कर्तृत्व,त्यांचे शौर्य,ज्वलंत धर्माभिमान आणि स्वराज्याप्रती असलेली अपार निष्ठा हे गुण म्हणजे महाराष्ट्राच्या तेजस्वी परंपरेचा वारसा आहेत. शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयामुळे, हा तेजस्वी वारसा नव्या पिढ्यांना प्रेरणादायी ठरेल आणि स्वराज्य व स्वधर्माच्या अभिमानाचे संस्कार नव्या पिढ्यांवर घडविण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.
Previous Articleन्हावेलीत डबक्यात पडून इसमाचा मृत्यू
Next Article भारताने आफ्रिकन देशांसोबत भागीदारी वाढविणे गरजेचे









