राजाराम साखर कारखान्याचे संचालक अमल महाडिक : कायदेशीरबाबी तपासून पुढील दिशा ठरवणार
प्रतिनिधी/कोल्हापूर
राजाराम कारखान्याच्या 973 सभासदांना अपात्र ठरविण्याचा निर्णय धक्कादायक आहे. केवळ राजकारणासाठी या सभासदांना विरोध करण्यात आला, ही बाब खेदजनक आहे. मात्र सभासदांच्या न्याय हक्कासाठी इथून पुढच्या काळातही आमचा लढा सुरुच राहणार आहे. न्यायव्यवस्थेचा सन्मान ठेवून निर्णयाचा स्विकार करत आहे. यासंदर्भातील कायदेशीर बाबी तापसून पुढील दिशा ठरवणार असल्याचे राजाराम कारखान्याचे संचालक माजी आमदार अमल महाडिक यांनी प्रसिद्धी पत्रकातून स्पष्ट केले.
पत्रकात म्हटले आहे, विरोधकांनी राजकीय हेतूने प्रेरित होऊन कारखान्याच्या 1899 पात्र सभासदांबाबत निष्कारण तक्रार करून त्यांचे सभासदत्व रद्द करण्याची मागणी केली होती. यापैकी 484 सभासद याआधीच पात्र ठरविले होते. उर्वरित 1457 सभासदांपैकी कार्यक्षेत्राबाहेरील भादोले येथील 338, दुबार व तिबार नावे असलेले 69, शेअर्स रद्द झालेले 2 आणि मृत 33 अश्या एकूण 442 सभासदांच्या चौकशीचा मुळातच प्रश्न उद्भवत नाही. हे 442 सभासद असेही मतदान प्रक्रियेत भाग घेऊ शकत नव्हते. फक्त जास्तीत जास्त सभासद अपात्र ठरविले हे दाखविण्यासाठी आकडा फुगवून ही नावे त्या तक्रारीच्या यादीत घुसवली गेली होती.
हे ही वाचा : राजाराममध्ये महाडिकांना धक्का, बोगस १३४६ सभासद अपात्र
या 973 सभासदांनीही कारखान्याच्या पोटनियमास अनुसरूनच सभासदत्व घेतले होते. तरीही राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेऊन हे सभासद महाडिक यांना मानणारे असल्यानेच या सभासदांना लक्ष केले गेले. त्यामागे मतदान कमी करणे इतकाच उद्देश होता. त्या सभासदांवरती अन्याय होऊ नये याकरीताच आम्ही हा लढा उभारला. पण दुर्दैवाने त्या काळामध्ये राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना सत्तेचा वापर करून विरोधकांनी त्यांना हवा तसा सहकार खात्याकडून निकाल लावून घेतला व तशीच शेरा असलेली कागदपत्रे न्यायालयासमोर सादर केली गेली.
यासर्व प्रक्रियेमध्ये सभासदांच्यावतीने न्यायालयासमोर ठाम बाजू मांडली. मात्र निर्णयानंतर कारखान्याचे खरे मालक असलेले 973 सभासद शेतकरी त्यांच्या अधिकारापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे त्यांच्या न्याय्यहक्कासाठी शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी उभे राहून लढा सुरु ठेवणार असल्याचे कारखान्याचे संचालक माजी आमदार अमल महाडिक यांनी सांगितले आहे.









