वृत्तसंस्था/ मुंबई
रविवारी येथे झालेल्या 2022 मुंबई हाफ मॅरेथॉनमध्ये महाराष्ट्राचा छगन बोंबाळे तसेच आंध्रप्रदेशची कविता रेड्डी यांनी अनुक्रमे पुरुष आणि महिला विभागातील विजेतेपद पटकाविले.
रविवारी मुंबई हाफ मॅरेथॉनला बांद्रा-कुर्ला क्रीडा संकुलापासून प्रारंभ करण्यात आला. ढगाळ वातावरणात या हाफ मॅरेथॉनचा शेवट जीओ गार्डन्स येथे झाला. पुरुषांच्या विभागात महाराष्ट्राच्या छगन बोंबाळेने 21 किमी अंतर 1 तास, 16.11 मिनिटामध्ये पार करत प्रथम स्थान पटकाविले. भगतसिंग वालवीने 1 तास, 17.51 मिनिटांचा अवधी घेत दुसरे तर अनिल जिंदालने 1 तास 18.20 सेकंदाचा अवधी तिसरे स्थान मिळविले.
महिलांच्या विभागासाठी झालेल्या या मॅरेथॉनमध्ये आंध्रप्रदेशच्या कविता रेड्डीने 1 तास 37.03 मिनिटांचा अवधी घेत पहिले स्थान पटकाविले. महाराष्ट्राच्या तन्मया करमरकरने 1 तास 40.18 मिनिटांचा अवधी घेत दुसरे तर महाराष्ट्राच्या केतकी साठेने 1 तास 44.55 सेकंदाचा अवधी घेत तिसरे स्थान मिळविले.
मुंबई हाफ मॅरेथॉनचे उद्घाटन भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर या मॅरेथॉनमधील विजेत्यांना सचिनच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. मुंबई हाफ मॅरेथॉन तीन विविध गटामध्ये घेतली गेली. या मॅरेथॉनमध्ये सुमारे 13,500 धावपटू सहभागी झाले होते. एनईबी स्पोर्टस्ने मुंबई हाफ मॅरेथॉन आयोजित केली होती. पुरुषांच्या 10 किमी पल्ल्याच्या शर्यतीमध्ये अमित माळीने प्रथम स्थान, करण शर्माने दुसरे तर संजय झकानने तिसरे स्थान मिळविले. महिलांच्या विभागात रोहिणी पाटीलने प्रथम स्थान, प्रियांका पायकारावने दुसरे तर प्रियांका कैलाशने तिसरे स्थान मिळविले.









