वृत्तसंस्था/ मुंबई
रविवारी येथे झालेल्या सातव्या मुंबई हाफ मॅरेथॉनमध्ये पुरुष विभागात महाराष्ट्राच्या छगन बोंबाळेने तर महिलांच्या विभागात हरियाणाच्या भारतीने विजेतेपद पटकावले. या हाफ मॅरेथॉनमध्ये सलग दुसऱ्या वर्षी छगन बोंबाळेने विजेतेपद मिळवले आहे.

21 कि. मी. पल्ल्याच्या या हाफ मॅरेथॉनमध्ये 22 वर्षीय छगनने 1 तास 12 मिनिटे 14 सेकंदाचा अवधी घेत विजेतेपद मिळवले. गेल्या वर्षी त्याने ही स्पर्धा 1 तास 16 मिनिटात जिंकली होती. महिलांच्या विभागात हरियाणातील सोनेपतच्या 25 वर्षीय भारतीने 1 तास 19 मिनिटे 19 सेकंदाचा अवधी घेत विजेतेपद हस्तगत केले. महाराष्ट्राची प्राजक्ता गोडबोले 1 तास, 21 मिनिटे, 08 सेकंदाचा अवधी घेत दुसरे स्थान तर प्राजक्ता शिंदेने 1 तास, 21 मिनिटे 27 सेकंदाचा अवधीत तिसरे स्थान मिळवले. पुरुषांच्या विभागात धीरज यादवने 1 तास, 12 मिनिटे, 41 सेकंदाचा अवधी घेत दुसरे स्थान, अनंतर गावकरने 1 तास, 14 मिनिटे, 03 सेकंदाचा अवधीत तिसरे स्थान मिळवले. भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हा मुंबई मॅरेथॉनचा ब्रँड अॅम्बॅसिडर आहे. पुरुषांच्या 10 कि. मी. पल्ल्याच्या शर्यतीत भविष्य कौशिकने पहिले स्थान, अक्षयकुमारने दुसरे तर अतुल बर्डेने तिसरे स्थान घेतले. महिलांच्या 10 कि.मी. मॅरेथॉनमध्ये सोनाली देसाईने पहिले स्थान, साक्षी भंडारीने दुसरे तर पद्मा करंडेने तिसरे स्थान मिळवले.









