ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आमच्यासाठी विठ्ठल आहेत. पण आमच्या या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नाव न घेता जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर केली.
वांद्रे येथील एमईटी मैदानावर अजित पवार गटाचा मेळावा सुरू आहे. या मेळाव्यात भुजबळ बोलत होते. ते म्हणाले, आम्ही भाजपसोबत गेलो म्हणून आमच्यावर टीका होत आहे. नागालँडमध्ये राष्ट्रवादीचे सात आमदार भाजपसोबत गेले. मग आम्ही त्यांच्यासोबत गेलो तर काय झालं. आपली विचारधारा जी आहे, ती कायम राहिली पाहिजे. विचारधारेत आम्ही तडजोड करणार नाही. कारण शरद पवार आमच्यासाठी विठ्ठल आहेत. पण त्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे.
पवार साहेबांना वाईट वाटण स्वाभाविक आहे. पण हे का झालं, याचाही विचार त्यांनी करणं गरजेचं आहे. साहेबांनी वसंतदादांना सोडलं तेव्हा त्यांनाही वाईट वाटलं असेल, धनंजय मुंडे यांना पक्षात घेतलं तेव्हा काका गोपीनाथ मुंडे आणि भगिनी पंकजा मुंडे यांनाही असं वाईट वाटलं असेल, मला शिवसेनेतून राष्ट्रवादीत घेतले तेव्हा बाळासाहेबांनाही असंच वाईट वाटलं असेल.
अजित पवार यांच्यासोबत 40 पेक्षा जास्त आमदार आहेत. त्यांच्या प्रतिज्ञापत्रावर सह्या झाल्या आहेत. बैठकीला सर्व आमदार आले नाही. कारण काही विदेशात आहेत, काही आजारी आहेत. राष्ट्रवादीत पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होत नव्हत्या. महिला अध्यक्षांच्या निवडणुका झाल्या नाही. वारंवार सांगूनही नियुक्त्या झाल्या नाही. बडव्यांमुळे शरद पवार यांनी सांगूनही सगळी कामं थांबली होती, असेही त्यांनी सांगितले.








