प्रतिनिधी,कोल्हापूर
Kolhapur News : आगामी लोकसभा,विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथे शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पदाधिकाऱ्यांबरोबरच्या आढावा बैठकीला गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके यांनी उपस्थिती लावली.चेतन नरके यांच्यासह त्यांचे वडील गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके,संदीप नरके यांचीही उपस्थिती जिल्ह्यातील शिवसैनिकांसाठी भुवया उंचवणारी ठरली.मात्र बैठकीमध्ये उमदेवारीबाबत कोणतीही चर्चा झाली नाही.यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभेची निवडणुक लागली असे समजूनच कामाला लागण्याचे आदेश दिले.तसेच आपल्याला केवळ लोकसभा लढायची नसून ती जिंकायची आहे,त्या दृष्टीतून प्रयत्न करा,असेही पक्षप्रमुख ठाकरे यांनी सांगितले.
शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादीत झालेल्या बंडानंतर राज्यासह कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली.बदललेल्या राजकीय परिस्थितीत जिल्ह्यातील कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन लोकसभा मतदार संघातून उमेदवार कोण,या जागा कोणत्या पक्षाला जाणार हे अद्याप निश्चित नाही. कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीकडून निवडणुक लढण्यास गोकुळचे संचालक डॉ.चेतन नरके इच्छुक होते.तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा काही महिन्यापुर्वी झालेल्या कोल्हापूर दौऱ्यात त्यांनी डॉ.नरके यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. त्यानंतर डॉ. नरके यांच्या उमेदवारीबाबत जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली.पण अजित पवार बंडानंतर सध्या भाजप शिवसेना (शिंदे गट) महायुतीसोबत आहेत.या महायुतीमध्ये कोल्हापूर लोकसभेची जागा शिंदे गटाच्या वाट्यालाच राहण्याची शक्यता असून विद्यमान खासदार संजय मंडलिक हे उमेदवार असणार आहेत.अजित पवार यांच्या बंडामुळे डॉ.नरके यांची सध्या राजकीय गोची झाली आहे.
दरम्यान,शिवसेना उपनेते संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्या उपस्थितीत दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये जिल्ह्यातील शिवसैनिकांचा मेळावा झाला.मेळाव्यात शिवसैनिकांनी अगामी लोकसभा निवडणुकीत उपरा उमेदवार नको,निष्ठावंत शिवसैनिकाला संधी द्या अशी भुमिका मांडली होती.या मेळाव्यामधून शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी कोल्हापूरमधून तर मुरलीधर जाधव यांनी हातकणंगले लोकसभा मतदार संघातून निवडणुक लढण्याची इच्छाही व्यक्त केली होती.पण मुंबईमधील बैठकीला नरके कुंटुंबियांनी लावलेल्या उपस्थितीमुळे जिल्ह्यातील शिवसेनेच्या राजकारणाला नवीन वळण मिळाले आहे.लोकसभा निवडणुक लढण्यास इच्छुक असणारे डॉ.नरके यांच्या उमेदवारीबाबत बैठकीमध्ये कोणतीही चर्चा झालेली नसली तरी ते आगामी लोकसभा निवडणुकीत ते शिवसेनेचे उमेदवार असणार की नाही हे पुढील काळात स्पष्ट होणार आहे.
दरम्यान,मातोश्रीवरील मंगळवारच्या या बैठकीला माजी आमदार संजयबाबा घाटगे,सत्यजित पाटील-सरूडकर, डॉ. सुजित मिणचेकर, उल्हास पाटील,जिल्हाप्रमुख संजय पवार,मुरलीधर जाधव आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
जागा कोणाच्या वाट्याला?
कोल्हापूर लोकसभेची जागा महायुतीमध्ये शिंदे गटाकडे राहण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीमध्ये ही जागा शिवसेनेकडे असली तरी काँग्रेचे नेते आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापुरची जागा काँग्रेसला देण्याची मागणी केली आहे.मतदार संघातील सद्यस्थिती पाहता ठाकरे गटाकडे सध्यातरी ताकदवान उमेदवार नाही.काँग्रेसकडेही अद्याप उमेदवाराचा चेहरा नसला तरी आमदार सतेज पाटील हे महायुतीला टक्कर देण्यासाठी सक्षम आहेत.त्यामुळे कोल्हापुरची जागा महाविकास आघाडीमध्ये कोणाकडे जाणार हे ही पाहणे गरजेचे आहे.
उसना उमेदवार नको
मुंबईमधील बैठकीला जिल्ह्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधी, जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती. बैठकीला सुरुवात झाली असता काही पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर आता उसना उमेदवार नको असा आवाज दिला.
अरुण नरके पूर्वी होते शिवसेनेत
राज्यात 1995 ते 1999 काळात शिवसेना-भाजप युतीचे सरकार होते. तेंव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री होती. कोल्हापूरचे पालकमंत्री रामदास कदम होते. त्यांच्याकडे दूग्धविकास मंत्रीपद होते. त्या काळात कोल्हापूर जिल्ह्यातील महादेवराव महाडिक, अरुण नरके ही गोकुळवर राज्य करणारी नेते मंडळी शिवसेनेत दाखल झाली होती. तो काळ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा होता. आता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आहेत. नरके पूर्वीच्या संबंधाचा धागा पकडून मंगळवारी मातोश्रीवर दाखल झाले असावेत, अशीही चर्चा होती.








