वृत्तसंस्था/ मुंबई
येथे 16 ते 24 जून दरम्यान ऑरियनप्रो ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केली असून या स्पर्धेत 17 देशांचे सुमारे 400 बुद्धिबळपटू सहभागी होत आहेत. सदर स्पर्धेत बक्षिसाची एकूण रक्कम 40 लाख रुपये आहे.
ही स्पर्धा दोन विभागात खेळवली जाणार आहे. ग्रँडमास्टर तसेच कनिष्ठांसाठी ही स्पर्धा वेगवेगळी खेळवली जाईल. ग्रँडमास्टर विभागात जॉर्जियाचा ग्रँडमास्टर लिव्हेन पेन्टसुलियाला मानांकनात अग्रस्थान देण्यात आले असून अर्मेनियाचा ग्रँडमास्टर मॅन्युअल दुसऱ्या स्थानावर तर जॉर्जियाचा ग्रँडमास्टर पॅचेडेझ तिसऱ्या स्थानावर आहे. कनिष्ठ गटात 12 वर्षीय फिडे मास्टर अनाश नेरुरकर भारताचे नेतृत्व करणार आहे. कनिष्ठ गटात पाँडिचेरीचा मधेशकुमार, महाराष्ट्राचा अविरत चौहान यांचा समावेश आहे. या स्पर्धेत लंकेची 12 वर्षीय महिला इंटरनॅशनल मास्टर ओशिनी गुणवर्धने ही प्रमुख आकर्षण राहिल.









