वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रविवारी येथे झालेल्या वेदांत पुरस्कृत दिल्ली हाफ मॅरेथॉनमध्ये पुरुष विभागात युगांडाचा आंतरराष्ट्रीय धावपटू जोशुआ चेपतेगीने तर महिलांच्या विभागात इथोपियाच्या अलेमाडीस ईयायुने विजेतेपद पटकाविले.
युगांडाचा चेपतेगी हा पुरुषांच्या 10 हजार कि.मी. शर्यतीतील विद्यमान विश्व आणि ऑलिम्पिक चॅम्पियन आहे. दिल्ली हाफ मॅरेथॉनमध्ये त्याने 59 मिनिटे 46 सेकंदाचा अवधी घेत विजेतेपद पटकाविले. महिलांच्या विभागात इथोपियाच्या ईयायुने 1 तास, 8 मिनिटे आणि 17 सेकंदाचा अवधी घेत अजिंक्यपद मिळविले. भारतीय पुरुष आणि महिलांच्या इलाईट विभागात अनुक्रमे सावन बरवाल आणि लिली दास यांनी अजिंक्यपदे पटकाविली. बरवालने 1 तास, 02.46 सेकंदाचा अवधी घेतला. तर लिली दासने 1 तास 18 मिनिटे आणि 12 सेकंदाचा अवधी नोंदविला. रविवारी या हाफ मॅरेथॉनला येथील जवाहरलाल नेहरु स्टेडियमपासून प्रारंभ झाला. विश्व अॅथलेटिक्स गोल्ड लेबल रोड रेस अंतर्गत ही 19 वी दिल्ली हाफ मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली. विविध गटात देशातील आणि विदेशातील धावपटूंनी मोठ्या संख्येने आपला सहभाग दर्शविला. या स्पर्धेसाठी विविध गटातील विजेत्यांकरीता 260,000 अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस ठेवण्यात आले होते.









