क्रीडा प्रतिनिधी /मडगांव
ड्युरँड चषक फुटबॉल स्पर्धेतील लीग लढतीत चेन्नईन एफसीने त्रिभुवन आर्मी संघाचा 3-0 गोलानी पराभव करून उपान्त्यपूर्व बाद फेरीत प्रवेश मिळविला. गुवाहाटीतील इंदिरा गांधी अॅथलेटीक स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या या लढतीत मध्यंतराला चेन्नईन एफसीने 2-0 अशी भक्कम आघाडी घेतली होती. फारूख चौधरी, रहिम अली आणि राफायल क्रिवेल्लारोने चेन्नईन एफसीसाठी गोल केले. चेन्नईनचे आता 2 सामन्यांतून 6 तर त्रिभुवन आर्मीचे 2 सामन्यांतून फक्त एक गुण झाला आहे. सामन्याच्या 22व्या मिनिटाला चेन्नईन एफसीने गोलचे खाते उघडले. यावेळी कॉन्नर शिल्डसने दिलेल्या पासवर विंगरच्या स्थानावर खेळणाऱ्या फारुख चौधरीने प्रतिस्पर्धी गोलरक्षकाला भेदले व चेंडू जाळीत सारला. त्यानंतर 39व्या मिनिटाला चेन्नईन एफसीने दुसरा गाल करून आघाडी 2-0 अशी वाढविली. यावेळी स्ट्रायकर जॉर्डन मरे याला बॉक्समध्ये पाडल्याबद्दल रेफ्रीने दिलेल्या पॅनल्टीवर रहीम अलीने चेन्नईन एफसीचा दुसरा गाल केला.
सामन्याच्या 83व्या मिनिटाला चेन्नईन एफसीने तिसरा गोल केला. यावेळी वैयक्तिक ब्रिलियन्सवर राफायल क्रिवेल्लारोने लांब पल्ल्यावरून हाणलेला फटका सरळ त्रिभुवन आर्मीच्या गोलमध्ये गेला. आता चेन्नईन एफसी या गटातील आपला शेवटचा लीग सामना दिल्ली एफसी संघाशी खेळतील. बेंगलोर एफसी आणि एआयएफ यांच्यातील खेळविण्यात आलेला सामना 1-1 असा बरोबरीत संपला. सामन्याच्या 20व्या मिनिटाला विवेकने गोल करून एआयएफला आघाडीवर नेले तर 58व्या मिनिटाला एस. जे. सिंगने बेंगलोरला बरोबरीत आणले. या निकालाने उभय संघांना प्रत्येकी एक गुण प्राप्त झाला. बेंगलोरचे एका सामन्यांतून एक तर एआयएफचा दोन सामन्यांतून एक गुण झाला.









