वृत्तसंस्था/ कटक
दुसऱ्या अल्टीमेट खो-खो स्पर्धेत चेन्नई क्विक गन्स संघाने आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. सोमवारी येथे झालेल्या सामन्यात चेन्नईने गुजरात जायंट्सचा 35-29 अशा गुण फरकाने पराभव केला. या स्पर्धेतील अन्य एका सामन्यात तेलगु योद्धाजने राजस्थान वॉरियर्सवर 34-27 अशा गुणांनी मात करत आपला सलग दुसरा विजय नोंदविला.
चेन्नई आणि गुजरात जायंट्स यांच्यातील सामन्यात चेन्नई संघातील रामजी कास्यंप याची कामगिरी सर्वोत्तम झाली. त्याने 10 गुण मिळविले. आपल्या शानदार चढाईच्या जोरावर त्याने आपल्या संघाला बोनस गुणही वसुल करुन दिला. सामन्याच्या मध्यांतरापर्यंत गुजरात जायंट्सने 14 गुण मिळविले होते. शुभम थोरात, दीपक माधव आणि पठाण यांची कामगिरी दर्जेदार झाली. चेन्नईने आपल्या चढायांवर केवळ 8 गुण मिळविले. त्यानंतर रामजी कास्यंपने गुजरात जायंट्सचे गडी आपल्या चढायांवर बाद करण्यात यश मिळविले. आक्रमक चढायांमध्ये गुजरातने केवळ 12 गुण तर चेन्नईने आपल्या शेवटच्या काही मिनिटांमध्ये 20 गुण वसुल केले. आता या स्पर्धेत चेन्नईचा पुढील सामना विद्यमान विजेत्या ओडीशा जुग्गेमाउट्स बरोबर होणार आहे. तर गुजरात जायंट्सचा सामना मुंबई खिलाडीज बरोबर होईल.
या स्पर्धेतील दुसऱ्या एका सामन्यात तेलगु योद्धाजने राजस्थान वॉरियर्सचा 34-27 असा पराभव केला. या स्पर्धेतील तेलगु योद्धाजचा हा सलग दुसरा विजय आहे. तेलगु योद्धाज संघातील आदित्य गणपुले आणि राहुल मंडल यांनी 12 गुण वसूल केले.









