वृत्तसंस्था/ मुंबई
चेन्नई सुपरकिंग्ज संघातील वेगवान गोलंदाज दीपक चहरला स्नायू दुखापत झाल्याने त्याला आता आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील आगामी काही सामन्यांना मुकावे लागणार आहे.
2022 च्या कालावधीत चहरला ही दुखापत झाली होती. त्यानंतर या दुखापतीवर वैद्यकीय इलाज केल्यानंतर तो पुन्हा तंदुरुस्त झाला. शनिवारी मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करताना त्याची ही स्नायु दुखापत पुन्हा डोके वर काढली. केवळ एक षटक टाकल्यानंतर त्याला या दुखापतीच्या वेदना होऊ लागल्या. या दुखापतीमुळे दीपक चहरला आता किमान या स्पर्धेतील 4 ते 5 सामन्यापासून अलिप्त रहावे लागेल, अशी माहिती जिओ सिनेमा चॅनेलवर क्रिकेट समालोचन करणाऱ्या तसेच चेन्नई सुपरकिंग्जचे माजी खेळाडू सुरेश रैनाने दिली आहे. आयपीएल स्पर्धेतील आता चेन्नई संघाला पुढील सामन्यासाठी दुसऱ्या ठिकाणी जावे लागत असल्याने या संघातील खेळाडूंना प्रवास करावा लागेल. चेन्नईने या सामन्यात मुंबईवर मिळवलेल्या विजयाबद्दल कर्णधार धोनीने समाधान व्यक्त केले आहे. मात्र उर्वरित सामन्यात दीपक चहरची उणीव आता आगामी काही सामन्यात चेन्नईला निश्चितच भासेल असेही धोनी म्हटले आहे. द. आफ्रिकेचा मगाला हा या संघातील नवा वेगवान गोलंदाज असून त्याने मुंबई विरुद्धच्या सामन्यात आपला सहभाग दर्शवला होता. मगाला, प्रटोरियस आणि तुषार देशपांडे यांच्यावर आता उर्वरित सामन्यात गोलंदाजीची भिस्त राहिल.









