वृत्तसंस्था/ चेन्नई
22 मार्चपासून सुरु होणाऱ्या 2025 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज दर्जेदार कामगिरी करेल असा विश्वास भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज आणि निवड सदस्य कृष्णमाचारी श्रीकांतने व्यक्त केला आहे. या स्पर्धेतील चेन्नईचा सलामीचा सामना बलाढ्या मुंबई इंडियन्स संघाबरोबर रविवारी दि. 23 मार्च रोजी होणार आहे.
आगामी आयपीएल हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूंनी सरावावर अधिक भर दिला आहे. गेल्या हंगामात चेन्नईची कामगिरी अपेक्षाभंग करणारी ठरली होती. या संघामध्ये अनुभवी आणि नवोदित खेळाडूंचे मिश्रण पहावयास मिळते. एम.एस. धोनी, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन हे अनुभवी खेळाडू असून त्यांचे या संघातील इतर नवोदितांना नेहमीच चांगल्या कामगिरीसाठी मार्गदर्शन मिळत असते. देशातील अनेक क्रिकेट शौकिन धोनीला पुन्हा नव्या पिवळ्या रंगाच्या जर्सीमध्ये मैदानात पाहण्यासाठी आतुरलेले आहेत. मुंबई इंडियन्सचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे सोपविण्यात आले असून रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, बोल्ट, कर्ण शर्मा, बुमराह हे प्रमुख खेळाडू आहेत. मात्र दुखापतीमुळे बुमराहला या स्पर्धेतील सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकावे लागणार आहे.









