वृत्तसंस्था/ चेन्नई
2023 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सोमवारी येथील चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपरकिंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याला सोमवारी सायंकाळी 7.30 वाजता प्रारंभ होईल.
आयपीएलच्या मोहिमेला चेन्नई संघाकडून चांगली सुरुवात झाली नाही. त्यांना या स्पर्धेतील अहमदाबादच्या पहिल्याच सामन्यात विद्यमान विजेत्या गुजरात टायटन्सकडून हार पत्करावी लागली होती. चेन्नई सुपरकिंग्जने आतापर्यंत चारवेळा आयपीएल क्रिकेट स्पर्धा जिंकली आहे. महेंद्रसिंग धोनीकडे पुन्हा संघाचे नेतृत्व सोपविण्यात आल्याने सोमवारच्या सामन्यात त्याचे निश्चितच मोठ्या प्रमाणात स्वागत होईल. जवळपास चार वर्षानंतर पूर्वाश्रमीच्या चेपॉक मैदानावर चेन्नई सुपरकिंग्जचे पुनरागमन होत आहे.
गुजरात संघाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ऋतुराज गायकवाडची फलंदाजी चांगलीच बहरली होती. गेल्या आयपीएल हंगामात ऋतुराज गायकवाडने आपल्या फलंदाजीत सातत्य राखत सर्वाधिक धावा जमवल्या होत्या. या पहिल्या सामन्यात गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले होते. सोमवारच्या सामन्यासाठी चेन्नई संघाने खरेदीलेल्या इंग्लंडच्या बेन स्टोक्सच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. चेन्नई संघाने स्टोक्सला 16.25 कोटी रुपयांच्या बोलीवर खरेदी केले होते. अनुभवी धोनीलाही आपल्या कामगिरीमध्ये सुधारणा करावी लागेल. दहा दिवसापूर्वी चिदंबरम स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा वनडे सामना खेळवला गेला होता. चेन्नई संघातील अष्टपैलू रविंद्र जडेजा आणि मिचेल सँटेनर यांची पहिल्या सामन्यातील कामगिरी फारसी प्रभावी झाली नाही. लंकेचा फिरकी गोलंदाज महेश तीक्ष्णा पहिल्या तीन सामन्यांसाठी उपलब्ध होणार नसल्याने चेन्नई संघाला अंतिम 11 खेळाडुत आणखी एक जादा फिरकी गोलंदाजाचा समावेश करावा लागेल.
के एल राहुलच्या नेतृत्वाखाली लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या मोहिमेला विजयाने शानदार प्रारंभ केला आहे. शनिवारी झालेल्या समन्यात लखनौने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला होता. लखनौ संघातील मेयर्सची फलंदाजी प्रभावी झाली होती. त्याचप्रमाणे वेगवान गोलंदाज मार्क वूड याने पाच गडी बाद करून संघाच्या विजयाला हातभार लावला होता. बिश्नोई आणि के. गौतम हे या संघातील फिरकी गोलंदाज आहेत. कर्णधार राहुल, पुरन, स्टोईनिस, मेयर्स, हुडा हे या संघातील प्रमुख फलंदाज आहेत. सोमवारच्या सामन्यात लखनौचा संघ आपली विजयी घोडदौड कायम राखण्याचा प्रयत्न करेल तर चेन्नईचा संघ पहिल्या विजयासाठी प्रयत्नांची शिकस्त करेल.
चेन्नई सुपरकिंग्ज – धोनी (कर्णधार), कॉन्वे, ऋतुराज गायकवाड, रायडू, मोईन अली, स्टोक्स, रविंद्र जडेजा, अजिंक्य रहाणे, मगाला, शिवम दुबे, प्रेटोरियस, मंडल, निशांत सिंधू, राजवर्धन हंगिरगेकर, सँटेनर, सेनापती, सिमरजित सिंग, एम. पतिरना, महेश तीक्ष्णा, बी. वर्मा, प्रशांत सोळंकी, शेख रशीद, आणि तुषार देशपांडे.
लखनौ सुपर जायंट्स : के. एल. राहुल (कर्णधार), मेयर्स, हुडा, कृणाल पांड्या, अमित मिश्रा, पुरन, नवीन उल हक, बडोनी, आवेश खान, कर्ण शर्मा, चरक, यश ठाकुर, शेफर्ड, मार्क वूड, स्वप्नील सिंग, व्होरा, सॅम्स, पी. मंकड, के. गौतम, जयदेव उनादकट, स्टोईनिस, बिश्नोई, मयांक यादव.
सामन्याची वेळ : सायंकाळी 7.30 वाजता.









