भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेतील सामने खेळण्याबाबत आयसीसी-पीसीबी यांच्यात उच्चस्तरीय चर्चा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एकदिवसीय सामन्यांची विश्वचषक स्पर्धा यंदा भारतात होणार असून त्यातील आपले सामने चेन्नई आणि कोलकाता येथे खेळण्यास पाकिस्तान क्रिकेट संघ प्राधान्य देईल, अशी चिन्हे दिसत आहेत. आयसीसीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दोन ठिकाणे संघाला त्यांच्या आधीच्या दौऱ्यांमध्ये सुरक्षित वाटली होती.
विश्वचषकाची सुऊवात 5 ऑक्टोबर रोजी होईल. अहमदाबाद, लखनौ, मुंबई, राजकोट, बेंगळूर, दिल्ली, इंदूर, मोहाली, गुवाहाटी आणि हैदराबादसह 12 भारतीय शहरांमध्ये अंतिम सामन्यासह 46 सामने खेळले जातील. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या आयसीसीच्या स्तरावर चर्चा सुरू असून पाकिस्तान क्रिकेट मंडळातील (पीसीबी) वरिष्ठ पदाधिकारी या संवेदनशील मुद्यावर आयसीसी कार्यकारिणीच्या उच्चस्तरीय पदाधिकाऱ्यांशी चर्चा करीत आहेत
बीसीसीआय आणि भारत सरकार काय निर्णय घेते यावर बरेच काही अवलंबून असेल. परंतु पर्याय दिल्यास, पाकिस्तानला त्यांचे बहुतेक विश्वचषक सामने कोलकाता आणि चेन्नईमध्ये खेळायला आवडेल. कारण कोलकाता येथे पाकिस्तान 2016 मध्ये भारताविऊद्ध ‘टी-20’ विश्वचषक सामना खेळला होता आणि खेळाडू सुरक्षा व्यवस्थेवर खूप खूष होते. त्याचप्रमाणे चेन्नई हे ठिकाण पाकिस्तानसाठी संस्मरणीय राहिले आहे. हा प्रकार विशिष्ट ठिकाणे सुरक्षित वाटण्याचा आहे, असे आयसीसीशी निकट असलेल्या एका सूत्राने नाव उघड न करण्याच्या अटीवर बोलताना सांगितले.
यात भारत विऊद्ध पाकिस्तान सामना हा वादाचा मुद्दा असेल. अहमदाबादमध्ये 1 लाख 32 हजार प्रेक्षक क्षमतेच्या स्टेडियमवर हा सामना आयोजित करून भरपूर नफा मिळविण्याची संधी आयसीसीला होती. परंतु नरेंद्र मोदी स्टेडियम आधीच अंतिम सामन्याचे आयोजन करण्यासाठी निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे दुसऱ्या ठिकाणी या लढतीचे आयोजन केले जाऊ शकते. प्रत्येक संघ साखळी टप्प्यात नऊ सामने खेळेल. आयसीसीची इव्हेंट कमिटी यजमान क्रिकेट मंडळाच्या सहकार्याने पुढील काही महिन्यांत अंतिम वेळापत्रक तयार करेल.
अलीकडेच, आयसीसीचे सरव्यवस्थापक वसीम खान यांनी वैयक्तिक मत व्यक्त करताना पाकिस्तानी मीडियाला सांगितले होते की, पाक संघ ‘हायब्रिड मॉडेल’चा एक भाग म्हणून बांगलादेशमध्ये आपले सामने खेळू शकतो. कारण आशिया चषक स्पर्धेतील सामने खेळण्यासाठी भारत पाकिस्तानमध्ये जाणार नाही. मात्र पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी बांगलादेशमध्ये विश्वचषकाचे सामने खेळण्याचा विचार फेटाळून लावला होता. शिवाय, ‘हायब्रीड मॉडेल’बाबत पाकिस्तानकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असे आयसीसीने स्पष्ट केले आहे.









