वृत्तसंस्था/ चेन्नई
चेन्नईतील हयात रीजन्सी येथे सुरू असलेल्या क्वांटबॉक्स चेन्नई ग्रँडमास्टर्स 2025 स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीच्या आणि दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस जर्मनीचा विन्सेंट कीमर मास्टर्स विभागात एकमेव आघाडीवर राहिला. त्याने भारताच्या व्ही. प्रणववर दणदणीत विजय मिळवला. दरम्यान, अमेरिकी ग्रँडमास्टर रे रॉबसनने दिवसातील सर्वांत मोठा धक्का देताना एका चुरशीच्या लढतीत विदित गुजरातीचा पराभव केला.
अग्रणी मानांकित अर्जुन एरिगेसीला डच ग्रँडमास्टर जॉर्डन व्हॅन फॉरेस्टने बरोबरीत रोखले, तर अनीश गिरी आणि निहाल सरिन यांनी एका संतुलित लढतीत बरोबरीवर समाधान मानून गुणांची विभागणी करून घेतली. कार्तिकेयन मुरली आणि अवंडर लियांग यांच्यातील सामनाही बरोबरीत सुटला.
चॅलेंजर्स विभागात, भारतीय ग्रँडमास्टर इनियन पाने ग्रँडमास्टर हरिका द्रोणवल्लीवर विजय मिळवून प्रभावित केले, तर ग्रँडमास्टर अभिमन्यू पुराणिकने लिओन ल्यूक मेंडोन्सावर विजय मिळवून पुनरागमन केले. उर्वरित दिप्तयन विऊद्ध प्रणेश, अधिबान विऊद्ध वैशाली आणि हर्षवर्धन विऊद्ध आर्यन हे सामने चुरशीचे ठरून बरोबरीत सुटले.









