अर्जुन एरिगेसीसमोर विदित गुजराती, अनीश गिरी, कीमरचे आव्हान
वृत्तसंस्था/ चेन्नई
या शहरात आज 6 ऑगस्टपासून सुरू होऊन 15 ऑगस्टपर्यंत चालणार असलेल्या चेन्नई ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेच्या विस्तारित तिसऱ्या आवृत्तीत भारताचा अव्वल खेळाडू अर्जुन एरिगेसीला अनुभवी सहकारी विदित गुजराती आणि नेदरलँड्सचा अव्वल खेळाडू अनीश गिरी यांच्या कठीण आव्हानाला पेलावे लागेल.
1 कोटी ऊपयांचे इनाम विजेत्याला देणारी ही ही स्पर्धा पहिल्यांदाच मास्टर्स आणि चॅलेंजर्स विभागांमध्ये क्लासिकल राउंड रॉबिन स्वरूपात नऊ फेऱ्यांमध्ये खेळवली जाईल. मागील दोन आवृत्त्यांमध्ये सात फेऱ्यांमध्ये खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत 19 ग्रँडमास्टर्स सहभागी होतील आणि महत्त्वाचे फिडे सर्किट गुण त्यांना मिळतील. 2026 च्या कँडिडेट्स स्पर्धेत स्थान मिळवण्याच्या दृष्टीने हे गुण महत्त्वाचे असतील. विश्वविजेत्या ठरलेल्या डी. गुकेशला कँडिडेट्स स्पर्धेत प्रवेश करण्याकामी याच गुणांनी मदत केली होती.
2800 च्या प्रतिष्ठेच्या फिडे रेटिंग क्लबमध्ये स्थान मिळविलेल्या एरिगेसीला गेल्या वर्षीच्या जागतिक स्पर्धेत गुकेशच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला जर्मनीचा 20 वर्षीय विन्सेंट कीमर आणि निहाल सरिन यांच्याही जोरदार आव्हानाला सामोरे जावे लागेल. परंतु त्याचा सर्वांत कठीण प्रतिस्पर्धी गिरी असेल, जो अनुभव आणि जोरदार शैली घेऊन उतरेल. तो स्पर्धेच्या विजेतेपदासाठीच्या दावेदारांपैकी एक आहे.
प्रस्थापित नावांव्यतिरिक्त भारताचे प्रणव व्ही. आणि कार्तिकेयन मुरली देखील काही आश्चर्यकारक निकाल देण्यास सक्षम आहेत. स्पर्धेच्या नवीन आवृत्तीने एक महत्त्वपूर्ण विस्तार केला असून 20 खेळाडू सहभागी झाले आहेत आणि प्रत्येकी 10 खेळाडूंच्या दोन वेगळ्या विभागांमध्ये ते विभागले गेले आहेत. मास्टर्स आणि चॅलेंजर्स. ही नवीन रचना उदयोन्मुख ताऱ्यांना सर्वोच्च स्तरावर स्पर्धा करण्यासाठी थेट मार्ग प्रदान करते. चॅलेंजर्स विजेत्याला 2026 च्या मास्टर्समध्ये निश्चित स्थान मिळेल.
दरम्यान, चॅलेंजर्स विभागात डी. हरिकासारख्या काही तितक्याच प्रतिभावान खेळाडूंचा समावेश आहे. ती गेल्या वर्षीच्या 45 व्या बुद्धिबळ ऑलिंपियाडमधील सुवर्णपदक विजेत्या महिला संघाचा भाग होती. आर. वैशाली, हर्षवर्धन जी. बी., अभिमन्यू पुराणिक, अनुभवी ग्रँडमास्टर अधिभान भास्करन हे देखील स्पर्धेत असतील.









