वृत्तसंस्था/चेन्नई
चेन्नई ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत जर्मनीच्या व्हिन्सेंट कीमरला सलग दुसऱ्यांदा बरोबरीवर समाधान मानावे लागले. पाचव्या फेरीत भारताच्या विदित गुजरातीने त्याला रोखले असले, तरी गुणतालिकेच्या शीर्षस्थानी आपली पकड कीमरने कायम ठेवली आहे. या निकालामुळे कीमर भारताच्या अर्जुन एरिगेसीपेक्षा एका गुणाने पुढे राहिला आहे. अर्जुनला त्याचा देशबांधव प्रणव व्ही. नेही बरोबरीत रोखले. एरिगेसी आणि कीमर सहाव्या दिवशी एकमेकांशी लढतील आणि त्यात कीमर पांढऱ्या सोंगाट्या घेऊन खेळेल. मास्टर्स विभागात जॉर्डन व्हॅन फॉरेस्टने दिवसाचा एकमेव निर्णायक निकाल नोंदवला. त्याने अमेरिकन ग्रँडमास्टर रे रॉबसनला हरविले. प्रत्येकी 2 गुणांसह त्यांची बरोबरी झाली आहे. भारतीय ग्रँडमास्टर निहाल सरिनने अवांडर लियांगशी, तर अनीश गिरीने मुरली कार्तिकेयनशी बरोबरी साधली. चॅलेंजर्स विभागात आघाडीवर असलेला ग्रँडमास्टर अभिमन्यू पुराणिकने ग्रँडमास्टर हरिका द्रोणवल्लीला हरवून त्याची आघाडी एका पूर्ण गुणावर नेली.
इंटरनॅशनल मास्टर हर्षवर्धन जी. बी. ने ग्रँडमास्टर वैशाली रमेशबाबूवर काळ्या सोंगाट्या घेऊन खेळताना विजय मिळवला, तर ग्रँडमास्टर लिओन ल्यूक मेंडोन्सा ग्रँडमास्टर प्रणेश एम. शी बरोबरी साधून संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर राहिला. ग्रँडमास्टर इनियन पा व ग्रँडमास्टर दिप्तयन घोष यांना देखील बरोबरीवर समाधान मानावे लागले. यंदा तिसरे वर्ष असलेल्या चेन्नई ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत मास्टर्स आणि चॅलेंजर्स असे दोन गट असून त्यात प्रत्येकी 10 खेळाडू सहभागी झालेले आहेत. 10 दिवसांत नऊ फेऱ्यांमध्ये ही स्पर्धा होईल. 1 कोटी ऊपयांची इनामे या स्पर्धेत ठेवण्यात आली असून मास्टर्स गटातील विजेत्याला 25 लाख ऊ., तर चॅलेंजर्स गटातील विजेत्याला 7 लाख ऊ. आणि 2026 च्या स्पर्धेतील मास्टर्स गटामध्ये स्थान मिळेल. या स्पर्धेतून फिडे सर्किट पॉइंट्स देखील मिळविता येणार असून मास्टर्समधील विजेता 2026 च्या कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरण्याच्या दृष्टीने 24.5 गुणांची कमाई करेल.
पाचव्या दिवसानंतर मास्टर्स गटातील स्थिती
व्हिन्सेंट कीमर – 4 गुण, अर्जुन एरिगेसी 3 गुण, अनीश गिरी, विदित गुजराथी, मुरली कार्तिकेयन, अवांडर लियांग – प्रत्येकी 2.5 गुण, निहाल सरिन, प्रणव व्ही, रे रॉबसन, जॉर्डन व्हॅन फॉरेस्ट – प्रत्येकी 2 गुण. चॅलेंजर्स गटातील स्थिती : अभिमन्यू पुराणिक – 4.5 गुण, प्रणेश एम., दिप्तयन घोष, लिओन ल्यूक मेंडोन्सा – प्रत्येकी 3.5 गुण, इनियान पा – 3 गुण, अधिबान भास्करन – 2.5 गुण, आर्यन चोप्रा, हर्षवर्धन जी. बी. – प्रत्येकी 1.5 गुण, वैशाली रमेशबाबू 1 गुण, हरिका द्रोणवल्ली – 0.5 गुण.









