वृत्तसंस्था/चेन्नई
क्वांटबॉक्स चेन्नई ग्रँडमास्टर्स, 2025 मध्ये झालेल्या सहाव्या फेरीच्या सामन्यात भारतीय ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसीने स्पर्धेतील आघाडीवर असलेला खेळाडू विन्सेंट केमरला कठीण बरोबरीत रोखले. या निकालामुळे जर्मन ग्रँडमास्टर सहा फेऱ्यांनंतर मास्टर्स गटात अव्वल स्थानावर कायम राहिला असून त्याला एक गुणाची आघाडी कायम ठेवता आली आहे. अर्जुन अग्रस्थान पटकावण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. आणखी एका महत्त्वाच्या निकालात अमेरिकेचा 22 वर्षीय ग्रँडमास्टर अवांडर लियांगने 18 वर्षीय ग्रँडमास्टर प्रणव व्ही. याचा बहुप्रतीक्षित ‘वंडरकिड’ लढाईत पराभव केला. लियांगने अर्जुनच्या बरोबरीने गुण मिळवले आहेत आणि जेतेपदासाठीची रस्सीखेच वाढवली आहे. यंदा तिसऱ्या वर्षात पोहोचलेली क्वांटबॉक्स चेन्नई ग्रँड मास्टर्स, 2025 ही भारताची सर्वांत मोठी क्लासिकल गटातील बुद्धिबळ स्पर्धा आहे. ‘एमजीडी1’द्वारे आयोजित या स्पर्धेत दहा दिवसांत नऊ फेऱ्या होणार असून प्रत्येकी 10 खेळाडूंच्या मास्टर्स आणि चॅलेंजर्स अशा दोन विभागांचा त्यात समावेश आहे.
आतापर्यंत अपराजित असलेल्या कीमरने क्वीन्स पॉनसह सुऊवात केली, तर अर्जुनने स्लाव्ह डिफेन्ससह प्रत्युत्तर दिले. जर्मन खेळाडूने सुऊवातीची गती जपली, परंतु अर्जुनने पुनरागमन केले आणि कीमरला विजयात रुपांतर करता येणार नाही याची काळजी घेतली. मास्टर्समधील इतर सामन्यांत विदित गुजराती आणि अनीश गिरीने बरोबरी साधली, तर जॉर्डन व्हॅन फॉरेस्टने काळ्या सेंगाट्या घेऊन खेळताना निहाल सरिनविऊद्ध विजय मिळवला. कार्तिकेयन मुरलीनेही रे रॉबसनला बरोबरीत रोखले. चॅलेंजर्समध्ये एम. प्रणेशने आघाडीवर असलेल्या अभिमन्यू पुराणिकच्या अपराजित वाटचालीला रोखले आणि जिथे जेतेपदासाठीच्या शर्यतीत केवळ एकच खेळाडू आहे असे वाटत होते तिथे तीन दावेदार निर्माण केले. या विजयामुळे प्रणेशने अग्रस्थानावर अभिमन्यूशी बरोबरी साधली आहे. आर्यन चोप्रावर विजय मिळवल्याने लिओन ल्यूक मेंडोन्साही त्यांच्यासोबत आला आहे.









