वृत्तसंस्था/ भोपाळ
येथील मध्यप्रदेश अकादमीच्या नेमबाजी मैदानावर घेण्यात आलेल्या राष्ट्रीय नेमबाजी निवड चाचणी स्पर्धेत पुरुषांच्या 50 मी. रायफल प्रोन टी-5 या प्रकारात सेनादलाचा नेमबाज चेन सिंगने विजेतेपद पटकाविले.
या क्रीडा प्रकारात चेन सिंगने 623.6 गुण नोंदवित विजेतेपद घेताना नौदलाचा नेमबाज निरज कुमारला मागे टाकले. निरज कुमारने 622.5 गुणांसह दुसरे स्थान तर मध्यप्रदेशच्या ऐश्वर्य प्रतापसिंग तोमरने 622.2 गुणांसह तिसरे स्थान मिळविले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेमबाजी स्पर्धेत 33 वर्षीय चेन सिंगने आतापर्यंत किमान 90 पदके मिळविली असून त्यामध्ये 12 सुवर्णपदकांचा समावेश आहे. 2016 च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. 2014 च्या इन्चेऑन येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने कांस्यपदक मिळविले होते. 2018 साली जर्मनीत झालेल्या आयएसएसएफ विश्व चषक ग्रां प्रि नेमबाजी स्पर्धेत त्याने रौप्यपदक पटकाविले होते.









