गुजराती चित्रपटाने ‘आरआरआर’, ‘काश्मीर फाइल्स’ला मागे टाकले
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
ऑस्कर 2023 साठी भारताच्या वतीने ‘छेल्लो शो’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट शेणीत नामांकन मिळाले आहे. हा एक गुजराती चित्रपट असून याची कहाणी गावातील एका मुलाच्या अवतीभोवती घुटमळणारी आहे.
110 मिनिटांच्या या चित्रपटाच्या ऑस्करमधील एंट्रीमुळे अनेक चण चकीत झाले आहेत. ऑस्करसाठी ‘आरआरआर’ किंवा ‘द काश्मीर फाइल्स’ला नामांकन मिळणार असल्याची अनेकांची अपेक्षा फोल ठरली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने मंगळवारी ऑस्कर 2023 साठी भारताच्या वतीने ‘छेल्लो शो’चे नामाकंन जाहीर केले आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन पान नलिन यांनी ट्विट करत सोशल मीडियावर स्वतःचा आनंद व्यक्त केला आहे. छेल्लो शो (द लास्ट शो) या चित्रपटाची कहाणी गावातील एका छोटय़ा मुलाची असून त्याचे चित्रपटांवर प्रेम जडल्याचे दाखविण्यात आले आहे. छलाला गावात चित्रपट पाहण्यासाठी प्रोजेक्शन रुममध्ये एक मुला प्रोजेक्टर टेक्नीशियनला मदत करण्यासाठी म्हणून पोहोचतो आणि अनेक चित्रपट पाहतो. चित्रपट पाहत त्याचे जीवन पूर्णपणे बदलून जाते. चित्रपटात सिंगल स्क्रीन सिनेमा संस्कृती उत्तमप्रकारे सादर करण्यात आली आहे.
ऑस्करसाठीच्या नामांकन शर्यतीत अनेक बिगबजेट चित्रपट सामील होते. यात एस.एस. राजामौली यांचा ‘आरआरआर’, विवेक अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ फहद फाजिल यांचा चित्रपट ‘मलयंकुंजू’ आणि अभिनेता नानी यांचा चित्रपट ‘श्यामा सिंघा रॉय’ सामील होता.









