डेपोच्या आतील भागात पार्ट्या करण्याचे प्रमाण वाढले
बेळगाव : बेळगावचे फुफ्फुस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्हॅक्सिन डेपोला निसर्गाने श्रीमंती बहाल केली आहे. या परिसरात हजारो प्रकारची झाडे असून गर्द वनराईमुळे येथे विविध पक्षी झाडांवर वास करून आहेत. मात्र अलीकडच्या काळात या नैसर्गिक श्रीमंतीकडे पूर्ण दुर्लक्ष झाले असून परिसरातील सौंदर्याला गालबोट लागत आहे. व्हॅक्सिन डेपोमध्ये सहल करण्याची मानसिकता वाढीस लागली आहे. मात्र गर्द झाडीमुळे याठिकाणी कोण ये-जा करते याचा पत्ता लागत नाही. त्यामुळे डेपोच्या आतल्या भागात पार्ट्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. तेथे मद्यपान करून मद्याच्या बाटल्या फेकून दिल्या जात आहेत. यामुळे येथे फिरावयास येणाऱ्या नागरिकांची बरीच गैरसोय होत आहे. सध्या याठिकाणी असलेल्या आतल्या भागात पाण्याच्या पाईप फोडून टाकल्या आहेत. पाईप फुटल्याने तेथे असलेल्या छोट्याशा तलावसदृश भागातील पाणी बाहेर येत आहे. त्यामुळे सकाळ, संध्याकाळ येथे मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या वॉकर्सची गैरसोय होत आहे. व्हॅक्सिन डेपो हे बेळगाव शहराचे वैभव आहे. त्यामुळे त्याला कोणत्याही समस्येचे ग्रहण लागणार नाही, याची काळजी घेणे हे शासनाचे व पर्यायाने लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे.









