गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी सतर्कता
बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमाहद्दीवर चेकपोस्ट नाके उभारले जात आहेत. खबरदारी म्हणून आतापासूनच महाराष्ट्र सरकार आणि कर्नाटक सरकारकडून सीमाहद्दीत हे चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर वाहतुकीला लगाम घालण्यासाठी पोलीस खात्याकडून चेकपोस्ट नाके उभारले आहेत. बेकिनकेरे येथील अतिवाड क्रॉसनजीक चेकपोस्ट नाका उभारण्यात आला आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर आल्याने राष्ट्रीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. दरम्यान इच्छुकांकडून मतदारांना खुश करण्यासाठी साहित्याची वाहतूक केली जाते. यावर नजर ठेवण्यासाठी चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीदरम्यान गतवर्षी मतदारांना डबे, कुकर, मिक्सर आदी भेटवस्तू देण्यात आल्या होत्या. लोकसभा निवडणुकीसाठीही साहित्याचे वाटप होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक आयोग आणि पोलीस खात्याने खबरदारी घेतली आहे. कर्नाटक-महाराष्ट्र सीमाहद्दीवरील बाची, अतिवाड क्रॉस, राकसकोप आदी ठिकाणी चेकपोस्ट नाके उभारले आहेत. या ठिकाणी वाहनांची थांबवून चौकशी केली जात आहे. बेकायदेशीर वाहतुकीला आळा घालण्यासाठी या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विशेषत: निवडणुकीसाठी होणाऱ्या गैरव्यवहारांना चाप बसणार आहे.









