कर्नाटक राज्य संघ महासंघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : एम. के. हुबळी येथील मलप्रभा सहकारी साखर कारखान्यात बेकायदा कृत्ये व गैरव्यवहार झाल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी 2018 ते 2023 पर्यंत चौकशी करण्याचा आदेश बजावला आहे. मात्र, सदर कारखान्याची 2018 ते 2025 पर्यंत चौकशी करावी, अशा मागणीचे निवेदन सोमवारी कर्नाटक राज्य रयत संघ महासंघ यांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. मलप्रभा सहकारी साखर कारखान्यात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी व्हावी, यासाठी 20 सप्टेंबर 2024 रोजी बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात आले होते. त्यावेळी वार्षिक सभेत कारखान्याची चौकशी करण्याचा ठराव पारित करण्यात आला होता. तसेच विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सन 2018 ते 2023 पर्यंतच्या व्यवहारांची चौकशी करण्याचा आदेश जारी केला आहे. मात्र, 2018 ते 2025 पर्यंतच्या व्यवहारांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.









