दुर्घटना घडण्यापूर्वी महापालिकेने दक्षता घ्यावी : शहापूर विभाग श्री गणेशोत्सव महामंडळाचे निवेदन
बेळगाव ; गणेश विसर्जनासाठी वडगाव येथील नाझरकॅम्प येथे महापालिकेने पाण्याचा मोठा हौद बांधला आहे. त्या ठिकाणी घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येते. मात्र काही जण हा हौद धोकादायक असून भिंत पडण्याची शक्यता आहे, असे सांगत आहेत. तेव्हा त्याची महापालिकेच्या अभियंत्यांकडून पाहणी करून धोका असेल तर तो हौद बंद करावा किंवा त्या ठिकाणी योग्य प्रकारे भिंत बांधून गणेश विसर्जनाची सोय करावी, अशी मागणी मध्यवर्ती श्ा़dरी गणेशोत्सव महामंडळ, शहापूर यांच्यावतीने महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदर हौद हा अत्यंत धोकादायक आहे, असे सांगितले जात आहे. मात्र काही जण त्या ठिकाणी गणेशमूर्तींचे विसर्जन करत आहेत. कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पाहणी करावी आणि त्यानंतर योग्य तो निर्णय घ्यावा, असेही निवेदनात म्हटले आहे. याचबरोबर वडगाव परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना जुने बेळगाव येथील कलमेश्वर तलावामध्ये गणेशमूर्ती घेऊन जावे लागते. तेव्हा त्या ठिकाणी अधिक क्रेनची व्यवस्था करावी.
पर्यायी सोय करणे गरजेचे
दरम्यान, महत्त्वाचे म्हणजे शहापूर, वडगाव परिसरातील गणेशमूर्तींच्या विसर्जनाची व्यवस्था वडगाव परिसरात करण्यासाठी पर्यायी सोय करणेदेखील गरजेचे आहे. त्या दृष्टीने महापालिकेने तातडीने पाऊल उचलावे, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे. अशोक दुडगुंटी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शहापूर विभाग गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव, कार्याध्यक्ष रमेश सोनटक्की, उपाध्यक्ष अशोक चिंडक, सेक्रेटरी राजू सुतार, पी. जे. घाडी, शंकर केसरकर, माजी उपमहापौर संजय शिंदे, हिरालाल चव्हाण, दिनेश मेलगे, अमृत भाकोजी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
‘त्या’ विहिरीची दुरुस्ती कधी?
नाझरकॅम्प येथील या बांधण्यात आलेल्या हौदाशेजारीच विहीर आहे. ती विहीर कोसळली असून त्या विहिरीची डागडुजी आजपर्यंत करण्यात आली नाही. त्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्या विहिरीची पुनर्बांधनी करणे गरजेचे आहे. तेव्हा तातडीने त्या विहिरीचीही बांधणी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.









