पुणे / वार्ताहर :
पुण्यातील खडकी ॲम्युनेशन फॅक्टरीत नोकरी लावू देण्याचे आमिष दाखवून कोल्हापूर येथील एका तरुणासह इतरांची एकूण 12 लाख 29 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तीन आरोपींवर खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी बुधवारी दिली.
संदीप कुमार शर्मा (रा. कसबा पेठ, पुणे) या आरोपीस अटक करण्यात आली असून, त्याच्या इतर दोन साथीदारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत विशाल शिवानंद शिंदे (19,रा.नगर कळंबा, ता. करवीर, कोल्हापूर) यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार ऑगस्ट 2022 ते आतापर्यंत घडलेला आहे. आरोपी रवी याने तक्रारदार विशाल शिंदे यांना मिल्ट्री इंजिनिअरींग सर्व्हिसेसमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार आरोपीने त्याच्या फोन पेवर शिंदे यांना सुरुवातीला 60 हजार रुपये पाठविण्यास सांगितले. तसेच तक्रारदार यांच्या ओळखीचे हदाईतुल्ला गुलाब मनेर यांच्या व्हॉटसॲपवर आधारकार्ड, मार्कशीट अशी कागदपत्रे पाठवून इतर आरोपींच्या मदतीने तक्रारदार यांना कमांड हॉस्पीटल, पुणे येथे मेडिकल केल्याचा बनाव केला.
अधिक वाचा : शिष्यवृत्ती परीक्षा 12 फेब्रुवारीला
ऑक्टोबर 2022 मध्ये तक्रारदार व इतरांना त्यांच्या नावाचे बनावट ‘एमईएस’ (डिफेन्स) पास वर सही, शिक्क्याचे आयकार्ड व सर्व्हिस बुक देऊन नोकरीचे काम झाल्याचे व लवकरच जॉईनिंग लेटर मिळेल, असे सांगून बाकीचे पैसे भरण्यास सांगितले. त्याप्रमाणे 5 लाख 79 हजार रुपये व इतर जणांकडून 6 लाख 50 हजार रुपये घेऊन त्यांना कोणत्याही प्रकारे नोकरी दिली नाही.