संशयित रामेश्वरला जामीन मंजूर : दुसरा संशयित रविन भंडारीला अटकपूर्व जामीन मंजूर
प्रतिनिधी/ काणकोण
सरकारी नोकरी देण्याच्या आमिषाने पैसे उकळून फसवणूक केल्याप्रकरणी काणकोण पोलिसांनी अटक केलेला मोले, सत्तरी येथील संशयित आरोपी रामेश्वर आत्माराम मांद्रेकर याला जामीन मंजूर झाला आहे, तर या प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी रविन भंडारी याने अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्जही मंजूर झाला आहे. पैंगीण येथील कृष्णा कमलाकर नाईक या युवकाला वन खात्यामध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून या दोघांनी पाच लाख रु. घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
दरम्यान, इडडर-पैंगीण येथील निशा च्यारी यांनी केलेल्या तक्रारीवरून महालवाडा, पैंगीण येथील मिथिल च्यारी आणि इडडर, लोलये येथील प्रितेश च्यारी व मडगाव येथील पराग रायकर यांना नोकरीचे आमिष दाखवून इडडर, लोलये येथील एका युवकाची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. या तिन्ही संशयितांना जामिनावर सोडण्यात आलेले असून त्यांनी घेतलेली रक्कम परत देण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांना जामीन मंजूर करताना 10 दिवस पोलीस स्थानकावर हजेरी लावण्याचा आदेश काणकोणच्या न्यायालयाकडून देण्यात आला होता. ती मुदत नुकतीच संपली असल्याची माहिती काणकोणचे पोलीस निरीक्षक हरिश रा. देसाई यांनी दिली.
दरम्यान, गालजीबाग येथील पर्यटक कुटिरात मृतावस्थेत सापडलेला रशियन नागरिक डेनिस डेक्टोव्ह याचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. ही घटना 4 रोजी घडली होती. सदर मृतदेह मडगावच्या शवागारात ठेवण्यात आला होता, अशी माहिती निरीक्षक हरिश रा. देसाई यांनी दिली.









