प्रतिनिधी /मडगाव
गोव्यातील प्रमुख शहरांबरोबरच किनारपट्टी भागात मोठय़ा प्रमाणात काजू विक्री व्यवसाय फोफावला आहे. पण, गोव्याचा काजू असल्याचे सांगून अन्य राज्यांतून आयात केलेल्या काजूची विक्री या व्यापाऱयांकडून होत आहे. त्यामुळे हा काजू खरेदी करणाऱया ग्राहकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
गोव्यात काणकोणपासून पेडणेपर्यंत काजूचे पीक घेतले जाते. गोव्यातील काजू हा स्वादिष्ट असतो. त्यामुळे गोव्यातील काजूला नेहमीच पहिली पसंती असते. परंतु गेल्या काही वर्षापासून अन्य राज्यांतून आयात केल्या जाणाऱया कमी दर्जाच्या काजूची विक्री मोठय़ा प्रमाणात होत असून हा काजू गोव्याचाच असल्याचे सांगितले जात असल्याने ग्राहकांची फसवणूक होत आहे. या फसवणुकीवर अद्याप राज्य सरकारकडून कोणतीच कारवाई झालेली नाही. त्यामुळे गोव्यात काजू विक्रेत्यांकडून फसवणूक केली जात असल्याचा आरोप होत आहे व त्यातून गोव्याचीच बदनामी होऊ लागली आहे.
अन्य राज्यांतून, आफ्रिकेतून येतो काजू
देशातील अन्य राज्यांतून तसेच दक्षिण आफ्रिकेतून मोठय़ा प्रमाणात काजू गोव्यात येतो. येथील काजू फॅक्टरीत हे काजू खरेदी करून त्याच्यावर प्रक्रिया करतात व तोच काजू व्यापाऱयांकडे जात असतो. हा काजू गोव्याच्या काजूच्या तुलनेत स्वस्त मिळत असल्याने व्यापारी तो खरेदी करतात व गोव्याचा काजू म्हणून विक्री करतात. त्यातून बऱयापैकी नफा कमावतात, अशी माहिती मिळाली आहे. गोव्यात उत्पादन घेतलेल्या जाणाऱया काजूची विक्री अवघ्याच व्यापाऱयांकडून होत आहे. मात्र, उर्वरित सर्व विक्रेते हे अन्य राज्यातून तसेच दक्षिण आफ्रिकेतून आयात केलेल्या काजूची विक्री करतात. काजूला नाव देतांना मात्र गोवा काजू असे देतात, पण प्रत्यक्षात तो गोव्याचा काजू नसतो.
एफडीएकडूनही होत नाही काहीच कारवाई
या काजूचा दर्जा तपासण्यासाठी सरकारी पातळीवर कोणतेच प्रयत्न झालेले दिसून येत नाहीत. एफडीएने हल्लीच दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील मिठाई विक्रेत्यांवर कारवाई केली आणि मोठय़ा प्रमाणात कालबाहय़ झालेला मावा तसेच इतर मिठाई जप्त केली. पण, एडफीएकडून कमी दर्जाचा काजू विक्री करणाऱया विक्रेत्यांवर एकही कारवाई झालेली नाही. एफडीए जर या काजूची तपासणी करणार नसेल, तर ती कोणी करावी? हा प्रश्न आहे. गोव्याचा काजू असल्याचे सांगून सर्रासपणे गोव्यात येणाऱया पर्यटकांची फसवणूक होत आहे.
अधिकतर बिगरगोमंतकीयांकडून होतेय फसवणूक
सासष्टीच्या किनारपट्टी भागात मोठय़ा प्रमाणात काजूची विक्री करणारी दुकाने थाटण्यात आलेली आहेत. या ठिकाणी काजूची बऱयापैकी विक्री होत आहे. मात्र, या सर्व दुकानांतून कमी दर्जाच्या काजूची विक्री केली जाते. किनारपट्टी भागात मोठमोठी दुकाने घेऊन त्या ठिकाणी काजूची विक्री करणारे व्यापारी हे बिगर गोमंतकीय आहेत. गोव्यात येणारे पर्यटक काजू खरेदी केल्याशिवाय परतीची वाट धरत नाहीत. पण, या पर्यटकांची व अन्य ग्राहकांची सरळ फसवणूक होत आहे.
स्थानिक शेतकऱयांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष
वेदेशांतून व खास करूनन दक्षिण आफ्रिकेतून काजू आयात होऊ लागल्यापासून गोव्यातील काजूला चांगला दर मिळत नसल्याने शेतकरीवर्गात नाराजी आहे. काजू बागायतीची साफ-सफाई करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात कामगारांची गरज भासते. या कामगारांवर येणारा खर्च देखील भरून येत नाही. त्यामुळे काजू बियांना चांगला दर मिळावा अशी येथील शेतकरी सातत्याने मागणी करत आलेला आहे. परंतु, ही मागणीदेखील पूर्ण होत नाही. त्यात कमी दर्जाच्या काजूची विक्री करून गोव्याची बदनामी करण्याचे प्रकार सुरूच आहे.
सरकारच्या कृषी खात्याने तसेच गोवा कृषी पणन मंडळाने देखील या प्रकाराकडे गांभीर्याने पाहण्याची वेळ आलेली आहे. एफडीएने देखील काजूच्या दर्जाकडे लक्ष देण्याची गरज आहे. तेव्हाच कुठे ग्राहकाची व खास करून गोव्यात येणाऱया पर्यटकांची फसवणूक थांबेल.
काजूचे गोवा ब्रँडिंग करणे हाच उपाय : प्रकाश वेळीप

गोव्याचा काजू म्हणून दर्जाहिन काजू विकण्याचा प्रकार मोठय़ा प्रमाणात घडू लागला आहे. त्यामुळे गोव्याची बदनामी होत आहे. यावर आत्ताच नियंत्रण मिळविणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी गोवा कृषी पणन मंडळ प्रयत्नशील असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी दिली. अस्सल गोव्याचा काजू उपलब्ध करण्यासाठी ब्रँडिंग करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गोव्यात येणाऱया पर्यटकांच्या माथी दर्जाहिन काजू व्यापाऱयाकडून मारला जातो. हा प्रकार खुपच गंभीर आहे. गेल्या दोन वर्षापूर्वी गोवा कृषी पणन मंडळाने यावर उपाय योजना आखण्यासाठी पाऊल टाकले होते. मात्र, त्याचवेळी नवीन कृषी कायदा अस्तित्वात आला, त्यामुळे जरा विलंब झाला असला तरी सरकारच्या मदतीने आत्ता पुन्हा नव्याने दर्जाहिन काजूच्या विक्रीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न केले जातील असे प्रकाश वेळीप म्हणाले.
काजूविक्रेत्यांना परवाना आवश्यक
काजूगरांची विक्री करण्यासाठी व्यापाऱयांना गोवा मार्केटींग बोर्डाचा परवाना काढणे आवश्यक आहे. परंतु बरेच व्यापारी मार्केट शुल्क भरीत नसल्याचे आढळून आले आहे. त्यासाठी गोवा मार्केटींग बोर्ड किनारपट्टी भागातील सर्व काजू विक्रेत्यांची माहिती गोळा करणार आहे. गोवा मार्केटींग बोर्ड अधिनियमांतर्गत अधिसूचित केलेल्या 26 वस्तूंमध्ये काजूचा समावेश आहे. त्यामुळे व्यापाऱयांना परवाना घेणे बंधनकारक असल्याची माहिती प्रकाश वेळीप यांनी दिली.
गोवा बागायतदार, आदर्श कृषी सोसायटी तसेच झांटय़े काजू फॅक्टरी हे गोव्याचा काजू खरेदी करतात व त्यावर प्रक्रिया करतात. त्याची माहिती उपलब्ध होत असल्याने गोव्यात काजूचे उत्पादन किती झाले, याची आकडेवारी मिळते. गोव्यात शेजारील राज्यातून तसेच आफ्रिका व व्हिएतनाममधून काजू गोव्यात येतो व त्यावर प्रक्रिया केली जाते. त्याच बरोबर शेजारील राज्यातून प्रक्रिया केलेला काजू रेल्वे तसेच बसगाडय़ातून येतो. त्याचे पॅकिंग गोव्यात केले जाते व हाच काजू गोव्याचा म्हणून विकला जातो. काजू विकण्यास हरकत नाही. पण, तो गोव्याचा काजू म्हणून विकला जातो याला आक्षेप आहे. त्याच बरोबर मार्केटींग शुल्क पण भरले जात नाही. त्यामुळेच मार्केटींग बोर्ड व्यापाऱयांची माहिती गोळा करणार आहे. त्याद्वारे दर्जाहिन काजू विक्री करणाऱयाच्या मुळापर्यंत जाणे शक्य होईल असे मत प्रकाश वेळीप यांनी व्यक्त केले आहे.
सरकारने गोव्याच्या काजूचे ब्रँडिंग करणे अत्यंत आवश्यक आहे. गोव्याचा काजू कुठे मिळणार याची माहिती पण लोकांना उपलब्ध झाली पाहिजे. या काजूचे पॅकिंग करताना काजूवर कुठल्या फॅक्टरीत प्रक्रिया करण्यात आली आणि कधी केली याची माहिती पण ग्राहकांना मिळणे आवश्यक आहे तरच दर्जाहिन काजूवर नियंत्रण मिळविणे शक्य होईल असे मत श्री. वेळीप यांनी व्यक्त केले.









