प्रतिनिधी / बेळगाव
चव्हाट गल्ली येथील रहिवाशांनी पाऊस पडावा यासाठी वरुण राजाला साकडे घातले. लक्ष्मी टेक येथे मंगळवारी दुपारी पूजा, अर्चा करण्यात आली. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावर्षी पावसाने दडी मारली आहे. जून महिना संपायला आला तरी पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे साऱ्यांचेच डोळे आकाशाकडे लागले आहेत. रोहिणी व मृग नक्षत्राला मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत असते. मात्र यावर्षी दोन्ही नक्षत्रे कोरडी गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता देवाकडे धावा घेतला आहे.
चव्हाट गल्ली येथील ज्योतिर्लिंग देवदादा सासन काठी व चव्हाट गल्ली येथील नागरिकांकडून लक्ष्मी टेक येथील लक्ष्मी मंदिरामध्ये पूजा, अर्चा करून वरुण राजाला साकडे घातले. पावसा आम्हाला तार आणि तुझे आगमन होवू दे याचबरोबर शेती पिकू दे, धनधान्याने घर भरु दे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
चव्हाट गल्लीतील पंच प्रताप मोहिते यांच्या हस्ते विधिवत पूजा, अर्चा करण्यात आली. 11 कुमारिकांची ओटी भरण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी लक्ष्मी किल्लेकर, उत्तम नाकाडी, लक्ष्मण नाईक, सुनील जाधव, अॅड. अमर येळ्ळूरकर, दिगंबर पवार, भाऊ नाईक, प्रवीण धामणेकर, चंद्रकांत कणबरकर, अनंत बामणे, बाबू मोहिते, विश्वास धुराजी यांच्यासह महिला व नागरिक उपस्थित होते.