म्हापसा पालिका बैठकीत निर्णय : नगरसेवकांनी विविध प्रश्नांवरून नगरध्यक्षांना धरले धारेवर
म्हापसा : येत्या चतुर्थीच्या बाजारात येणाऱ्या माटोळी सामान विक्रेत्यांना जे. के. वाईन ते नास्नोळकर ज्वेलरी शॉप दरम्यान जागा देण्यात आली आहे. तसा निर्णय मार्केट कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्या बैठकीचा इतिवृत्तांत म्हापसा पालिकेच्या बैठकीत सादर केला असता त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. म्हापसा नगराध्यक्षा प्रिया मिशाळ यांच्या अध्यक्षतेखाली आजची बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. म्हापशात जे सेल्फ हेल्प ग्रुप आहेत ते दरवर्षी बाजारपेठेत आपली खाद्य पदार्थाची दुकाने थाटतात. त्यांना म्हापसा बाजारपेठेत शकुंतलाजवळ बाजूला स्टॉल्स देण्यात आले आहेत. 105 X 105 अशी चौ. मीटर जागा मापून देण्याचे यावेळी ठरविण्यात आले. तसेच म्हापसा बाजारपेठेत फायर्सवर्क स्टॉल्ससाठी टॅक्सी स्थानकाजवळ सुदीप फास्ट फूडसमोर जागा देण्याचे ठरविले. या सर्वांना 3X2 चौ.मी. अशी जागा देण्यात येणार आहे. कदंब बस स्थानकाजवळ मोकळी जागा आहे. ती जागा चतुर्थीच्या काळात पार्किंगसाठी ठेवण्याचा निर्णय पालिकेच्या बैठकीत घेण्यात आला.
बाजारपेठेत बंब, ऊग्णवाहिका नेण्यास जागा मोकळी ठेवणार
म्हापसा बाजारपेठेत आपत्कालीनवेळी अग्निशामन दलाचे बंब बाजारपेठेत जाताना बराच त्रास होतो. त्याची दखल घेत या रस्त्याच्या बाजूलाच मधोमध दोन्ही बाजूंनी फळविक्रेत्यांना बसवून मधला रस्ता बंब व रुग्णवाहिका जाण्यासाठी खुला ठेवण्यात येईल. तशी माहिती म्हापसा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा प्रिया मिशाळ यांनी दिली.
गणेशोत्सव रंगकामास प्रथम विरोध, नंतर मान्यता
मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर यांच्या पालिकेतील मनमानी कारभाराला नगराध्यक्ष प्रिया मिशाळ यांचा छुपा पाठिंबा असल्याचे बैठकीत उघड झाले. म्हापसा पालिकेच्या प्रवेशद्वारावर मागच्या 60 वर्षांपासून म्हापसा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. 1970 सालापासून म्हापसा पालिका मंडळ दरवर्षी प्रवेशद्वार गणेश चतुर्थी पूर्वी रंगरंगोटी करून देण्याची प्रथा आहे. पण यंदा मुख्याधिकारी शेटकर यांनी टेंडर नोटीसवर सही करण्यास नकार दिला होता. नगराध्यक्ष मिशाळ यांनी सुद्धा मुख्याधिकाऱ्यांना कळत नकळत सहमती दिली व इतर नगरसेवकांना याप्रकरणी अंधारात ठेवले गेले. पण नगरसेवक प्रकाश भिवशेट व नगरसेविका अन्वी कोरगांवकर यांना बैठक संपण्यापूर्वी विषय उपस्थित केला व प्रवेशद्वार पालिकेचे आहे व गेल्या अनेक वर्षापासून पालिका गणरायाच्या पुजनास्थळी रंगरंगोटी करण्याची प्रथा आहे. ती मोडीत काढू नका असा जोर धरला. नगरसेवक सुधीर कांदोळकर, साईनाथ राऊळ, शुभांगी वायंगणकर यांनी रंगकाम करण्याची मागणी केली. नगरसेवक आशीर्वाद खोर्जुवेकर व आनंद भाईडकर यांनी पेंटिंग पालिका मंडळा ऐवजी गणेशोत्सव मंडळाला मारण्यास भाग पाडावे, अशी सूचना केली. चर्चेअंती चतुर्थीपूर्वी प्रवेशद्वार रंगरंगोटी करण्याचा ठराव संमत झाला. प्रकाश भिवशेट व अन्वी कोरगांवकर यांनी अनुमोदन दिले. पालिकेकडे पैसे नसल्यास नगरसेवकांनी पैसे काढून प्रवेशद्वार रंगकाम करून देण्याची सूचना प्रकाश भविशेट यांनी मांडली. त्यालाही काही नगरसेवकांनी पाठिंबा दिला.
भेलपुरीवाल्यांच्या मुद्द्यावर गरमागरम चर्चा
म्हापसा पालिकेने बाजारपेठेतील सर्व भेलपुरी वाल्यांना केअल ब्रागांझा यांच्या वॉर्डात फुडकोर्टसाठी जागा दिली असल्याने सर्व भेलपुरीवाले आता अॅक्सिस बँक समोर आजूबाजूला आपले गाडे लावतात. यामुळे येथे सर्व कचरा होऊन त्याचा त्रास येथील ग्रामस्थांना होतो. इतकेच नव्हे तर आजूबाजूचे तसेच बस्तोडा भागातील नागरिक आपला कचरा आणून येथे टाकतात. यास नगरसेविका केअल ब्रागांझा यांनी तीव्र आक्षेप घेऊन हे गाळे अन्यत्र हटवावे व त्यांना इतरत्र जागा द्यावी, अशी मागणी केली. यावर बरीच गरमागरम चर्चा झाली. मात्र नगराध्यक्षांनी फुड कोर्ट घालण्यास जागा सूचवा वा जागा द्या, असे आवाहन केले. मात्र याबाबत कुणीच काही सूचविले नसल्याने याबाबत पाहणी करून सूचविले जाईल, असे नगराध्यक्षा प्रिया मिशाळ यांनी सांगितले..
शोअरमा वाल्याला कुणाचा आशीर्वाद
म्हापसा पालिकेने काही दिवसापूर्वी म्हापसा बाजारपेठेतील अतिक्रमण केलेल्या दुकानावर कारवाई केली असता काहीनी आपली दुकाने पुन्हा त्याच जागी मांडली आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी यावेळी नगरसेवकांनी केली. म्हापसा स्वाट मार्ट समोर, पीडब्ल्यूजी कार्यालयासमोर शोअरमावाल्याने आपला स्टॉल थाटला आहे. इतरांवर कारवाई झाली मात्र कुणाच्यातरी कृपाशीर्वादाने त्यांच्यावर मात्र कारवाई होत नाही, असा सवाल व्यक्त केला. त्या शोअरमावाल्यासही हटवावे, अशी मागणी साईनाथ राऊळ यांनी केली.
नगरसेवकांकडून प्रश्नाचा भाडीमार
आजच्या बैठकीला नगरसेवक अॅड. शशांक नार्वेकर व कमल डिसोझा अनुपस्थित होते. नगराध्यक्षा प्रिया मिशाळ मात्र आज आक्रमक असल्याचे पहायला मिळाले. आजच्या बैठकीत प्रकाश भिवशेट, शुभांगी वायंगणकर, सुधीर कांदोळकर, केअल ब्रागांझा, तारक आरोलकर, डॉ. नूतन बिचोलकर, विकास आरोलकर, आनंद भाईडकर, आशीर्वाद खोर्जुवेकर, चंद्रशेखर बेनकर, विराज फडते आदीनी प्रश्नांचा भाडीमार करीत नगराध्यक्षांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. मात्र नगराध्यक्षांनीही भक्कमपणे भूमिका बजावली.
वैज्ञानिकाचे म्हापसा पालिकेतर्फे अभिनंदन
‘चांद्रयान 3’ हे चंद्रावर पोचल्याने भारत देशाची मान गर्वाने उंचावली आहे. आमच्या वैज्ञानिकांनी चांगले कार्य केल्याबद्दल व भारताचा दर्जा वाढविल्याबद्दल म्हापला पिलका बैठकीत या वैज्ञानिकांचे ठरावाद्वारे अभिनंदन करण्यात आले. अशी माहिती नगराध्यक्ष प्रिया मिशाळ यांनी दिली.
आता वॉर्ड 11 ते 20 मधील घरोघरी कचराही उचलणार
म्हापसा नगरपालिका क्षेत्रात येणारे वॉर्ड क्रमांक 11 ते 20 या दरम्यान आता म्हापसा पालिका घरोघरी जाऊन कचरा गोळा करणार आहे. ही प्रक्रिया पालिका आऊट सोर्सिंगद्वारे करणार आहे. यासाठी 1 कोटी 88 लाख खर्च अपेक्षित असून हा खर्च कर्जाद्वारे उचलण्यात येणार आहे. बाकी खर्च पालिका खर्चातून जाणार आहे. म्हापसा पालिकेने कचरा उचलण्यासाठी अन्य नवीन एक ट्रक खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून याद्वारे गार्डन आदी भागातील कचरा उचलण्यात येणार आहे.









