केईएकडून विकसित; क्षणार्धात मिळणार उत्तर
बेळगाव : सामान्य प्रवेश परीक्षेसाठी (सीईटी) अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेपासून जागा (सीट) मिळेपर्यंत येणाऱ्या समस्या निवारण करण्यासाठी साहाय्यवाणीशी (हेल्पलाईन) संपर्क साधणे, तेथून पर्याय उपलब्ध होण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा करीत राहण्याची वेळ यापुढे विद्यार्थ्यांना येणार नाही. कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाने (केईए) आता कृत्रिम बुद्धिमत्तेचे चाटबोट अर्थात माहिती केंद्र विकसित केले असून याद्वारे विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण काही मिनिटात होणार आहे.
2025 मधील सीईटी 16 व 17 एप्रिलला होणार असून येत्या 23 तारखेपासून अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. सीईटी घेणाऱ्या कर्नाटक परीक्षा प्राधिकरणने कृत्रिम बुद्धिमत्तेचे चाटबोट विकसित केले आहे. अर्ज दाखल करताना प्रत्येकाचा क्रमांक केईए जाहीर करणार असून हा क्रमांक व्हाट्सअॅपमध्ये सेव्ह करून विद्यार्थ्यांनी आपली समस्या मांडल्यास काही क्षणात उत्तर मिळणार आहे. हेल्पलाईनद्वारे सर्वांना एकाच वेळी उत्तर देणे शक्य होणार नसल्याने कृत्रिम बुद्धिमत्तेचे चाटबोट विकसित केल्याचे केईएने म्हटले आहे.
साहाय्यवाणी केंद्र सकाळी 9 ते सायं. 6 पर्यंत
सीईटीसाठी अर्ज मागविण्यात आल्यानंतर प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईतोवर विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ही समस्या दूर करण्यासाठी केईएने साहाय्यवाणी सुरू केली आहे. तरी कॉलचे प्रमाण वाढत असल्याने एकाच वेळी सर्वांना उत्तर देणे शक्य होत नाही. केईएने सुरू केलेले साहाय्यवाणी केंद्र सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत कार्यरत राहणार आहे. साहाय्यवाणीवर 9 लाईन असतील. प्रत्येक संख्येवर एक याप्रमाणे 9 कॉल स्वीकारण्यात येणार आहेत. केईएला प्रतिदिन 13 ते 14 हजार कॉल येणार आहेत. मात्र, वेळेअभावी प्रतिदिन 2500 कॉल स्वीकारणे शक्य आहे. उर्वरित वेळेत लाईन बिझी लागत असल्याने विद्यार्थी कॉल कट करीत असतात. त्यामुळे त्यांच्या समस्येचे निराकारण होऊ शकत नाही. त्यामुळे चाटबोट विद्यार्थ्यांच्या मदतीला येणार आहे. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख कोणती? आरक्षण मिळण्यासाठी कोणती कागदपत्रे जोडावीत? यासारखी उत्तरे चाटबोटमधून मिळणार आहेत. एखाद्या वेळी चाटबोटमधून उत्तर अस्पष्ट दिसू लागल्यास त्याच्या बाजूस केईएने उपलब्ध करून दिलेल्या ईमेल पत्त्यावर प्रश्न विचारल्यास उत्तर उपलब्ध होणार आहे.









