विसर्जन तलावांच्या स्वच्छतेचे काम व्यवस्थित होत नसल्याची बाब निदर्शनास ः अधिकाऱयांनी कार्यवाही करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
गणरायांच्या स्वागतासाठी शहराच्या स्वच्छतेसह विसर्जन तलावांच्या स्वच्छतेचे काम महापालिका प्रशासन करीत आहे. मात्र, ही कामे काही ठिकाणी व्यवस्थित झाली नसल्याची बाब निदर्शनास आली आहे.
गणपती बाप्पांचा हा सण मोठय़ा उत्साहाने आणि श्रद्धेने साजरा केला जातो. पण श्रद्धेबरोबर पावित्र्य जपणेदेखील तितकेच आवश्यक आहे. पण या दृष्टीने महापालिकेकडून आवश्यक कामे केली जात नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. सध्या शहरातील स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. पण काही ठिकाणी अद्यापही कचऱयाचे ढिगारे साचून आहेत. तसेच तलावांच्या स्वच्छतेसह तलावांकडे जाणाऱया रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. शहरात नऊ ठिकाणी सार्वजनिक आणि घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. कपिलेश्वर तलावाच्या स्वच्छतेचे काम पूर्ण झाले असून रंगरंगोटी करण्यात आली आहे. या ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. पण तलावासमोरील पेव्हर्स उखडले असून काढून ठेवण्यात आले आहेत. गणरायांच्या आगमनास केवळ एक दिवसाचा अवधी शिल्लक राहिला आहे. पण अद्याप पेव्हर्स बसविण्यात आले नाहीत. कपिलेश्वर मंदिराशेजारील कपिलतीर्थच्या स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र या ठिकाणी काही जुनी वाहने थांबून आहेत.
रामेश्वर तलावाच्या स्वच्छतेचे काम आठवडय़ापूर्वीच करण्यात आले आहे. पण सध्या या ठिकाणी तलावाच्या काठावर नागरिकांनी टाकलेला कचरा, निर्माल्य, जुने फोटो अद्यापही पडून आहेत. तलावाच्या सभोवती मातीचे ढिगारे साचल्याने हटविण्याची गरज आहे. या तलावातील गाळ काढण्यात आला, पण तळाला साचलेले दूषित पाणी पूर्णपणे काढण्यात आले नाही. तलावाच्या स्वच्छतेचे काम अर्धवट झाल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.
तलावामधील सांडपाणी काढण्यात आले नसल्यास पाणी दूषित होण्याची शक्मयता आहे. तसेच अनगोळ तलावामध्ये असलेल्या विसर्जन कुंडातील पाणी बदलण्यात आले नसल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व समस्यांचे निवारण करणे आवश्यक असून महापालिकेच्या अधिकाऱयांनी याकडे लक्ष देऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.









