दिग्दर्शक विशाल भारद्वाज हे एक नवी वेबसीरिज घेऊन येत आहेत. या सीरिजचे नाव ‘चार्ली चोप्रा अँड द मिस्ट्री ऑफ सोलंग व्हॅली’ आहे. या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून तो अत्यंत प्रभावी आहे. ही वेबसीरिज अगाथा क्रिस्टी यांची कादंबरी द सिट्टाफोर्ड मिस्ट्रीवर आधारित आहे. या सीरिजमध्ये वामिका गब्बी मुख्य भूमिकेत आहे. वामिका यात डिटेक्टिव्ह चार्ली चोप्रा ही भूमिका साकारत असून ती ब्रिगेडियर मेहरबान रावत यांच्या हत्येचा तपास करत आहे. ब्रिगेडियरची भूमिका गुलशन ग्रोव्हर यांनी साकारली आहे. या सीरिजमध्ये विवान शाह देखील आहे. तसेच या सीरिजमध्ये विवानचे पिता म्हणजेच नसरुद्दीन शाह, त्यांच्या पत्नी रत्ना पाठक तसेच कनिष्ठ पुत्र इमाद शाह देखील दिसून येणार आहे. तसेच लारा दत्ता, नीना गुप्ता, पाओली दाम आणि चंदन रॉय सान्याल देखील यात भूमिका साकारत आहेत. याचा ट्रेलर पाहून प्रेक्षक कौतुक करत असून याला ‘मास्टरपीस’ ठरवत आहेत. भारद्वाज यांची ही सीरिज 27 सप्टेंबर रोजी सोनी लिव्हवर स्ट्रीम केली जाणार आहे. या सीरिजची कहाणी अंजुम राजाबाली आणि ज्योत्स्ना हरिहरन यांनी विशाल भारद्वाज यांच्यासोबत मिळून लिहिली आहे. वामिका गब्बी ही मागील काही काळात ओटीटी स्टार ठरल्याने तिच्या चाहत्यांसाठी ही सीरिज मोठी पर्वणी ठरणार आहे.








